चर्चा राजकारणातील ‘अदृश्य शक्ती’ची
जिल्हा परिषद निवडणुकीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. सिंधुदुर्गात ‘राणे ब्रँड’ चालला, तर रत्नागिरीत ‘सामंत-कदम’शाहीचा वरचष्मा राहिला. निवडणुकीत विजयाच्या रुपाने फार मोठे यश ठाकरे शिवसेनेच्या हाती लागले नाही, तरी त्यांना मिळालेली मते मात्र लक्षणीय होती. पण कोकणात यावेळेस जास्त चर्चा झाली ती राजकारणातील ‘अदृश्य शक्ती’ची. या अदृश्य शक्तीने शिवसेना-भाजप युतीच्या अधिकृत उमेदवारांची झोप उडवली. एवढेच नव्हे, तर काही जागांवर ‘अपक्षां’ना विजयी करण्यासाठी मोठी ताकदही दिली.
दोन महिन्यांपूर्वीच सिंधुदुर्गात पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये ‘अदृश्य शक्ती’चा मुद्दा खूप गाजला होता. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा युतीच्या नेत्यांकडून हा मुद्दा राजकीय पटलावर चर्चिला गेला. सर्वप्रथम चिपळूणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर प्रचारसभेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राजकारणातील ‘अदृश्य शक्ती’चा विषय उचलून धरला. विशेष म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दापोलीत काही अदृश्य शक्ती आपल्याविरोधात ठाकरे शिवसेनेला पाठबळ देण्याचे काम करीत असल्याची बाब शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या कानी घालत असताना कदम यांनी थेट भाजपवर आरोप केला. दापोली मतदारसंघात आपणास घेरण्याचा प्रयत्न होतोय. पण कुणी कितीही प्रयत्न केले, तरी आपण या सर्वांना पुरून उरणार. शिंदे साहेबांना 9 फेब्रुवारीला विजयाचे ‘बर्थडे गिफ्ट’ देणार, अशी गर्जना कदम यांनी महायुतीच्या सभेत केली. कदम यांनी केलेल्या या निर्धारामुळे दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील जि. प. व पं. स. लढतींना वेगळे वलय प्राप्त झाले. दापोलीत काय होतेय याची उत्सुकता सर्वांना लागली होती. परंतु बोलल्याप्रमाणे कदम यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. विरोधकांना त्यांनी आपल्या मतदारसंघातील मंडणगड, दापोली आणि खेड तालुक्यात डोके वर काढू दिले नाही. दापोली आणि मंडणगडात जि. प. च्या सर्व आठ जागा त्यांनी जिंकल्या. खेडमध्ये सातपैकी सहा जागा शिवसेनेने जिंकल्या. एका अर्थाने आपल्या मतदारसंघात अदृश्य शक्तींना थोपवण्यात योगेश कदम यशस्वी झाले. सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री नीतेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांनी 50 पैकी 40 जागा जिंकत ‘राणे ब्रँड’चा दबदबा कायम ठेवला. पण उर्वरित काही जागांवर अपक्षांनी मिळवलेले यश नीतेश यांना अस्वस्थ करून गेले. कारण सिंधुदुर्गात अपक्षांनी मिळवलेल्या जागा ठाकरे शिवसेनेच्याही दुप्पट आहेत. नीतेश यांच्या म्हणण्यानुसार, जे अपक्ष निवडून आले आहेत ते मुळात भाजपचेच बंडखोर आहेत. सावंतवाडी मतदारसंघात जे अपक्ष निवडून आले, त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून मते मागितली. त्यांनी महायुतीच्या विजयाच्या आनंदाला गालबोट लावण्याचे काम केले आहे. कारण ते भाजपचे चिन्ह कमळ याला पाडून निवडून आले आहेत. हे ना रवींद्र चव्हाण यांना मान्य आहे, ना अन्य कोणाला. अपक्षांनी भाजपात राहून काम केले असते, तर महायुतीचा एकतर्फी विजय झाला असता. अदृश्य हाताच्या नावाने भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात काम करणाऱ्या या अदृश्य हाताला बाजूला करण्याची वेळ आली असल्याचे विधान नीतेश यांनी केले. निवडणूक काळात कट्टर राणे समर्थक आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी ऐनवेळी भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून आडेली मतदारसंघातून घेतलेली माघार, हे त्याचे एक मोठे राजकीय उदाहरण मानले गेले. आपली उमेदवारी मागे घेत असताना राणेंविरोधात कार्यरत असलेल्या राजकारणातील काही अदृश्य शक्तींशी लढण्यासाठी आपण माघार घेत असल्याबाबतचे स्पष्टीकरण दळवी यांनी दिले होते.
दोन महिन्यांपूर्वी नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेचा योग्य सन्मान केला गेला नाही म्हणून आमदार नीलेश राणे भाजप विरोधात पेटून उठले होते. त्यांनीसुद्धा ‘अदृश्य शक्ती’ वरून अक्षरश: रान उठवले होते. त्यावेळी त्यांचा रोख थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर होता. रवींद्र चव्हाण भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत की सिंधुदुर्गचे?, असा सवाल करून त्यांनी चव्हाण यांनाच थेट टार्गेट केले होते. सिंधुदुर्गातील नगर परिषद निवडणुकांमध्ये प्रदेशाध्यक्षांनी एवढे लक्ष घालण्याचे कारण काय? असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला होता. नीलेश राणेंनी भाजप किंबहुना रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेचा त्यांना मालवण नगर परिषेदत चांगला फायदा झाला होता. तेथे स्वबळावर लढून शिवसेनेला नगराध्यक्षसह स्पष्ट बहुमत मिळाले होते. पण निवडणुकीनंतर लगेचच झालं गेलं विसरून रवींद्र चव्हाण आणि नीलेश राणे यांची नागपूर अधिवेशनावेळी गळाभेट झाली आणि हे मनोमिलन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये ‘महायुतीची नांदी’ मानली गेली. प्रत्यक्षात तसे घडलेसुद्धा. माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी महायुती दुभंगू नये, याची पुरेपूर काळजी घेतली. आपले दोन्ही चिरंजीव स्वतंत्र लढल्यामुळे कणकवली नगर पंचायत निवडणुकीत जो निकाल समोर आला, त्याची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत होऊ नये, यासाठी राणे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी अॅक्टीव्ह झाले. जिल्ह्यातील आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनी ‘राणे समर्थक’ लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठे शक्तिप्रदर्शन बांदा ते कणकवलीपर्यंत केले. जिल्ह्यात आपण एक ज्येष्ठ नेते म्हणून कार्यरत असताना पक्षातील अन्य कुणी येथे लक्ष देण्याची गरज काय, असा स्पष्ट संदेश राणेंनी आपल्या शक्ती प्रदर्शनातून दिला. त्याअगोदर दोन वर्षांपूर्वी आंगणेवाडीत झालेल्या भाजपच्या सभेतही राणेंनी समोर जमलेली गर्दी ही माझ्या 30 वर्षांच्या मेहनतीचे फलित आहे, असे ठणकावून सांगितले होते. कणकवलीतील त्यांच्या भाषणाचा रोखही तसाच स्पष्ट होता. अखेर पक्षनेतृत्वानेही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची सूत्रे नारायण राणेंच्या हातात सोपवली. त्यामुळे जे राणे नगर परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न झाल्याने प्रचारापासून दूर राहिले होते, ते जि. प. निवडणुकीत खूपच सक्रीय झालेले दिसले. तिकीट वाटपावरून महायुतीत निर्माण झालेले वाद शमवण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. तरीपण बंडखोरी झाली अन् ‘अदृश्य शक्ती’चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
महेंद्र पराडकर