For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाविकास आघाडीत चौथ्या भिडूची चर्चा

06:47 AM Oct 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाविकास आघाडीत चौथ्या भिडूची चर्चा
Advertisement

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाड्यांच्या चर्चांना आता सुरूवात झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणाऱ्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तीन पक्षात राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष सहभागी होणार की नाही यावऊन आता महाविकास आघाडीतील चर्चांना सुरूवात झाली आहे. एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येतात, एकत्र येताना केवळ मराठी भाषा हा एकमेव अजेंडा या अटीवर आपण एकत्र आल्याचे सांगतात. मात्र आता याच ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढत असल्या तरी दोघांकडूनही अद्याप शिवसेना आणि मनसे युतीबाबत कोणतीच घोषणा होत नाही. त्यात आता मनसेच्या ऊपाने नव्या भिडूची भर या आघाडीत पडणार का? की प्रादेशिक पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आगामी निवडणुकीत राजकीय युती होणार असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे बंधू एकत्र येतील मात्र महाविकास आघाडीचा भाग होणार असतील तर, त्याला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा मिळणार का? यावर महाविकास आघाडीतील घटकपक्षांबरोबरच महायुतीतील शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देखील राजकीय समीकरण अप्रत्यक्ष अवलंबून असणार आहे. काँग्रेस हा महाविकास आघाडीतील एकमेव राष्ट्रीय पक्ष, इतर दोन पक्ष शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हे प्रादेशिक पक्ष, काँग्रेसला सोबत घेऊनच निवडणुका लढविण्याची आणि महाविकास आघाडीत येण्याची मनसे प्रमुख राज ठाकरे यांची इच्छा असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तर यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला महाविकास आघाडीत स्थान नसल्याचा उच्चार केला होता. महाविकास आघाडीत आधीच तीन घटक पक्ष आहेत. त्यात चौथ्या भिडूची गरज नाही, असे वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते. मनसे संदर्भातला अंतिम निर्णय दिल्लीतले नेते घेतील असे सांगून सपकाळ यांनी सावध पवित्राही घेतला होता.

महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात चांगले यश मिळाले, 48 पैकी जवळपास 31 जागांवर आघाडीला यश मिळाले. यात सर्वाधिक काँग्रेसला 13 जागांवर यश मिळाले, त्यामुळे मरगळ आलेल्या आघाडीला राज्यात सत्ता येण्याचे वेध लागले. त्यात लोकसभा निकालानंतर मुठभर मांस वाढलेल्या आघाडीतील सगळ्याच पक्षांमध्ये, विधानसभा निवडणूकीपूर्वीच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावऊनच वादाची ठिणगी पडली. त्यामुळे काही वेळा आघाडीत बिघाडी झाल्याचा संदेश लोकांपर्यंत गेला, यामध्ये भर टाकली ती काँग्रेसच्या नाना पटोले आणि शिवसेनेच्या संजय राऊत यांनी. आता, पुन्हा एकदा महाविकास आघाडीत मनसेला घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे उतावीळ झाल्याचे दिसत आहेत. मनसे महाविकास आघाडीत यावी ही राऊत यांची इच्छा असणे रास्त आहे, मात्र राज ठाकरे यांची काँग्रेसला घेऊनच निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याचे राऊत सोमवारी बोलले. पण काही वेळेतच त्यांनीच आपल्या वक्तव्याबद्दल घुमजावही केले होते. राज ठाकरेंची काँग्रेस सोबत येण्याची इच्छा आहे, असे मी बोललोच नव्हतो, असा मेसेज त्यांनी खुद्द राज ठाकरे यांना पाठविला. एक तर मनसेची किमान युतीबाबतची भूमिका हे मनसेचे प्रवक्ते किंवा नेते माध्यमांसमोर मांडतील. अजून शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा होत नसताना, राऊत महाविकास आघाडीची भूमिका का मांडत आहेत, हा खरा सवाल आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षासारखी या पक्षांची भूमिका महाराष्ट्रातून जाहीर केली जात नाही. 2014 नंतर देशातील प्रादेशिक पक्षांचे राजकारण देखील बदलताना दिसत आहे. समान विचारधारा असणारे नव्हे तर परस्पर विरोधी विचारधारा असणारे पक्ष देखील केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येताना दिसले. महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. उध्दव ठाकरे, शरद पवार आणि अहमद पटेल या नेत्यांचे हे सरकार येण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिली. 2022 ला शिवसेना तर नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपप्रणीत आघाडीने देखील हाच  प्रयोग केला, आता आघाडी आणि युती दोन्हीकडे तीन तीन पक्ष आहेत. त्यात दोन्हीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीही आहे. आता प्रश्न आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाविकास आघाडीत येतील का? मनसेची स्थापना झाल्यानंतर 2006 पासून मनसेने शिवसेना-भाजपा युतीसोबत कधी युती केली किंवा कोणत्याच पक्षासोबत निवडणूकपूर्व युती न करता काही निवडणुका लढविल्या नाहीत. मात्र ज्या लढवल्या त्या स्वबळावर लढवल्या, त्यामुळे मनसे आघाडीत आल्यास ही मनसेची पहिली युती असणार आहे. मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र आले. त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते, मात्र काँग्रेसचा कोणीही नेता या मेळाव्याला उपस्थित नव्हता. कारण मराठी भाषेबाबत एक राजकीय पक्ष म्हणून भूमिका काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी मांडली. मात्र प्रादेशिक अस्मितेचा पुरस्कार करणाऱ्या पक्षासोबत मेळाव्याला हजर राहणे हे काँग्रेसारख्या राष्ट्रीय पक्षाने टाळले. त्यामुळे मनसे महाविकास आघाडीत आल्यानंतर प्रादेशिक अस्मितांच्या मुद्यांवरच भर असणार आहे. उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीत राहताना 5 वर्षात लवचिक भूमिका घेतली. या भूमिकेवऊन भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न देखील केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उध्दव ठाकरेंनी तिलांजली दिल्याचा आरोप देखील झाला. आता मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा प्रश्नच निकाली निघणार आहे, तर मनसेच्या कार्यकर्त्यांची भावना ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची आहे. मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीत सहभागी होण्याची आहे की नाही? हे देखील महत्त्वाचे असणार आहे, कारण आजपर्यंत राज ठाकरे यांनी कोणाशी युतीच केलेली नाही. त्यामुळे पहिल्यांदा युती करताना किमान कार्यकर्त्यांची भूमिका ही महत्त्वाची असणार आहे. महाविकास आघाडीत मनसे सहभागी झाल्यास तिनाचे चार होतील, मात्र महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीत काँग्रेस राहणार का हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.