‘संघटन पर्वा’ची दिल्लीत चर्चा
दामू नाईक यांनी घेतली राष्ट्रीय अध्यक्ष, सरचिटणीस यांची भेट
पणजी : गोवा प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर दामू नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली. या भेटीत दामू नाईक यांनी संघटना मजबूत करण्यासह संघटन पर्वाविषयी चर्चा केली. दामू नाईक यांनी गोव्यातील संघटन कार्याविषयी व हल्लीच झालेल्या सदस्यता नोंदणीबाबतची माहिती नड्डा यांना दिली. राज्यात भाजपचे सव्वाचार लाखांहून अधिक सदस्यांची नोंदणी झाल्याचे सांगितले. राज्यात ऑनलाईनद्वारे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आल्याचे सांगत 36 मतदारसंघांमध्ये मंडळ अध्यक्षांची निवड झालेली आहे.
दोन्ही जिल्हाध्यक्ष तसेच बुथ समित्यांची निवड प्रक्रिया पार पडली असल्याचे त्यांनी नड्डा यांना सांगितले. आगामी काळात गोव्यात संघटन आणखी मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची अपेक्षाही दामू नाईक यांनी नड्डा यांच्याकडे व्यक्त केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी दामू नाईक यांना शुभेच्छा देऊन संघटन पर्वाच्या कार्यासाठी झोकून देऊन काम करण्याचा सल्ला दिला आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांचीही भेट घेऊन राज्यातील संघटनाविषयी माहिती देऊन चर्चा केली. राज्यातील राजकीय स्थिती व तयारी याविषयी दामू नाईक यांनी सरचिटणीस संतोष यांच्याकडे चर्चा केली असल्याचे सांगितले.