अपघात रोखण्यासाठी उपक्रमांबाबत चर्चा
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत वायव्य कर्नाटक रस्ते परिवहनतर्फे बैठक
बेळगाव : सार्वजनिक बांधकामंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 25 रोजी झालेल्या वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन संस्थेच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीला वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन संस्थेचे उपाध्यक्ष सुनील हलुमण्णावर, व्यवस्थापकीय संचालक प्रियांका एम., मुख्य अभियंता शिवानंद नायक, तसेच संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रस्ते सुरक्षासंबंधी उपक्रम हाती घेण्यात येत नसल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. अपघात रोखण्यासाठी हाती घ्यावयाच्या उपक्रमांबद्दल बैठकीत चर्चा झाली. यावेळी काही निर्णयही झाले. राष्ट्रीय महामार्गावर निश्चित केलेल्या 49 ब्लॅकस्पॉट स्थळांची यादी सार्वजनिक बांधकाम खात्याला सादर करून केंद्रीय महामार्ग मंत्रालयाला पत्र पाठविणे व सुरक्षेसंबंधी उपाययोजना हाती घेण्याची मागणी करण्यात येईल, असे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.
संस्थेच्या हद्दीतील सहा महसूल जिल्ह्यांमध्ये एकूण 118 ब्लॅकस्पॉटबाबत कृती योजना तयार करून आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत प्रयत्न करावेत, अशी सूचना मंत्री जारकीहोळी यांनी संबंधितांना केली. चिकोडी उपविभागातील कागवाड ते गोटूर दरम्यान नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन संस्थेच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतलेल्या कामकाजाची माहिती यावेळी मंत्री जारकीहोळी व अधिकाऱ्यांना देण्यात आली. वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन संस्थेच्या हद्दीतील खुल्या जागा असलेल्या ठिकाणी नवे बस वे, बस शेल्टर, तसेच जंक्शन विकसित करण्यासाठी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केली.