For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-चीनदरम्यान महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत चीनदरम्यान महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा
Advertisement

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैनिकांना हटविण्याचा मुद्दा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

भारत-चीन सीमा विषयक विचारविनिमय आणि समन्वयासाठी स्थापन चर्चागटाची 29 वी बैठक पार पडली असून यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून पूर्णपणे सैनिकांना हटविणे आणि उर्वरित मुद्दे निकाली काढण्यावर चर्चा केली आहे. यासंबंधी भारतीय विदेश मंत्रालयाने गुरुवारी एक वक्तव्य जारी करत माहिती दिली आहे. संबंधित महत्त्वपूर्ण बैठक 27 मार्च रोजी बीजिंग येथे झाली होती. दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैनिक मागे घेण्याविषयी विचारविनिमय केला आहे. विदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव (पूर्व आशिया) यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले आहे. तर चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या विदेश मंत्रालयाच्s सीमा तसेच महासागरी विभागाच्या महासंचालकांनी केले आहे. अंतरिम स्वरुपात दोन्ही बाजू राजनयिक आणि सैन्य माध्यमातून नियमित संपर्कात राहणे आणि वर्तमान द्विपक्षीय करार तसेच प्रोटोकॉलनुसार सीमावर्ती क्षेत्रांमध्ये शांतता कायम राखण्याच्या आवश्यकतेवर सहमत झाले असल्याचे भारतीय विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. भारत-चीन सीमा विषयक चर्चा आणि समन्वयासाठी स्थापन कार्यगटाची 28 वी बैठक मागील वर्षी 30 नोव्हेंबर रोजी झाली होती. जून 2020 मध्ये लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैनिक परस्परांना भिडले होते. गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या झटापटीत भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. तर चीनचे 40 हून अधिक सैनिक मृत्युमुखी पडल्याचे मानले गेले होते. या झटापटीनंतर दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात सैन्य आणि मोठी शस्त्रसामग्री तैनात केली होती. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता, जो अद्याप कायम आहे. हा तणाव दूर करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान अनेक फेऱ्यांमध्ये राजनयिक आणि सैन्य स्तरीय चर्चा झाली असली तरीही परस्पर सहमती होऊ शकलेली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.