प्रियांका जारकीहोळींच्या नावाची चिकोडीमधून चर्चा
मंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती
बेळगाव : चिकोडी लोकसभा मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. यमकनमर्डी मतदारसंघातील हुदली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्रियांका जारकीहोळी यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत जिल्ह्यातील नेत्यांशी पुन्हा एकदा चर्चा केली जाणार आहे. यानंतरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निर्णय कळविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत उमेदवार होऊ इच्छिणाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्याशी चर्चा मसलत करून त्यांचे अभिप्राय घेतले जाणार आहेत. निवडणुकीला उभे राहणाऱ्यांचे म्हणणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडीसाठी पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली आहे. उमेदवार निवडीसाठी अद्याप कालावधी असून दुसऱ्या टप्प्यातील चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही 15 दिवस कालावधी मिळतो. त्यामुळे या दोन लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निवड प्रक्रिया पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अथवा शेवटच्या क्षणी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विजापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर असून त्याठिकाणी एकच उमेदवाराचे नाव देण्यात आले त्यानुसार त्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.