सभापतींकडून भेदभावाची वागणूक
अविश्वास प्रस्तावावर मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप : ‘इंडिया’च्या नेत्यांकडून हल्लाबोल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर बुधवारी इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याप्रसंगी राज्यसभा सभापतींवर हल्लाबोल केला. सभापती जगदीप धनखड सभागृहामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकासारखे वागतात. विरोधी पक्षाच्या खासदाराने 5 मिनिटे भाषण केले तर ते त्यावर 10 मिनिटे भाष्य करतात. सभागृहातील विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे सभापती आपले विरोधक म्हणून पाहतात. ज्येष्ठ असोत की कनिष्ठ, आक्षेपार्ह वक्तव्य करून ते विरोधी पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतात. त्यांच्या अशाप्dरकारच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळे आम्हाला अविश्वास ठराव आणावा लागला, असा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
लोकसभा आणि राज्यसभेत बुधवारी अविश्वास ठरावाच्या मुद्यावरून गदारोळ झाला. त्यानंतर राज्यसभा उद्यापर्यंत तर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. याचदरम्यान, संसदेचे कामकाज चालावे आणि सभागृहात चर्चा व्हावी, हे आमचे उद्दिष्ट आहे. मात्र सत्ताधारी पक्षाच्या ताठर भूमिकेमुळे कामकाज होत नसल्याचा दावा करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी मंगळवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाची नोटीस विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृह सचिवांना दिली होती.
खर्गेंनी सांगितली अविश्वास प्रस्तावाची कारणे
मल्लिकार्जुन खर्गे यांनी जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यामागील कारणे बुधवारी स्पष्ट केली. राज्यसभा सभागृहात अनुभवी नेते, पत्रकार, लेखक, प्राध्यापक आहेत. वेगवेगळ्या विभागांमधील अनेक तज्ञ सदस्य सभागृहात आहेत. त्यामध्ये 40-40 वर्षांचा अनुभव असलेल्या नेत्यांचाही समावेश असताना सभापती महोदय त्यांनाच ‘प्रवचन’ देतात, असे खर्गे म्हणाले. कोणत्याही मुद्यावर चर्चा होत असताना विरोधक वेळोवेळी सभापतींकडे दाद मागतात. पण सभापती केवळ पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाचे गुणगान करत असेल तर विरोधकांचे म्हणणे कोण ऐकणार? असा प्रश्नही खर्गे यांनी उपस्थित केला.
धनखड यांचे गेल्या तीन वर्षातील वर्तन हे पदाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे. कधी ते सरकारचे गुणगान गातात, तर कधी स्वत:ला आरएसएसचा एकलव्य म्हणवून घेतात. त्यांची ही कृती त्यांच्या पदाला शोभणारी नाही, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर विरोधक सरकारसमोर प्रश्न उपस्थित करताना सभापती स्वत: मंत्र्यांसमोर सरकारची ढाल बनून उभे असतात, असा आरोपही त्यांनी केला. सभापतींचे आमचे कोणतेही वैयक्तिक वैर, द्वेष किंवा राजकीय लढा नाही. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही अत्यंत विचारपूर्वक आणि मजबुरीने हे पाऊल उचलले आहे, असे स्पष्टीकरणही खर्गे यांनी दिले.
‘इंडिया’च्या नेत्यांचे आरोपास्त्र....
नदीम उल हक, तृणमूल काँग्रेस : राज्यसभा सभापतींच्या भेदभावपूर्ण वागणुकीमुळे आम्हाला वेगळे वाटू लागले आहे. आम्हाला बोलण्याची संधी मिळत नाही. सत्ताधारी पक्षाला पूर्ण संधी मिळते.
जावेद अली खान, समाजवादी पार्टी : विरोधी पक्षाच्या नेत्याला काही बोलायचे असेल तर सभापतींचा आदेश आहे की काहीही रेकॉर्डवर जाणार नाही. देशाच्या दुसऱ्या सर्वोच्च पदाच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा हे बरे वाटत नाही.
मनोज झा, राजद : सत्ताधारी पक्षाचे नेते ज्या प्रकारची शब्दावली वापरत आहेत त्यामुळे मला दु:ख झाले आहे. उद्या सरकार बदलले तर लोकशाही टिकवता येईल का?
संजय राऊत, शिवसेना-युबीटी : मी 22 वर्षे सभागृहात असून 4 सभापती पाहिले आहेत. आज मी जी परिस्थिती पाहत आहे, ती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती. सध्याचे सभापती संसद नाही तर सर्कस चालवत आहेत.
तिरुची शिवा, द्रमुक : जेव्हा विरोधी पक्षनेते बोलतात तेव्हा माईकही बंद केला जातो. सत्ताधारी बोलले तर दुसऱ्या दिवशी हेडलाईन्समध्ये येतात. म्हणजे आम्ही जे बोलतो ते ऐकले जात नाही. आमचे शब्द लोकांपर्यंत पोहोचत नाहीत.
‘सोरोस’ प्रकरणावरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न!
- जे. पी. नड्डा , भाजप
जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधी यांच्यासंबंधीचे प्रकरण हा देशाच्या अंतर्गत आणि बाह्या सुरक्षेचा प्रश्न आहे. देशाच्या सार्वभौमत्वावरही प्रश्नचिन्ह आहे. आमचे सरकार सामान्य जनतेचे असल्यामुळे आम्हाला सोरोस प्रकरणावर खुलासा अपेक्षित आहे. मात्र, ह्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी विरोधकांनी सभापतींवर आरोप करत अविश्वास प्रस्ताव आणला.