For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभेदबुद्धियोग

06:36 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अभेदबुद्धियोग
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

बाप्पा म्हणाले, राजा योगीराज हे ईश्वराचं सगुण रूप असतात. ज्या योगामुळे ते दृष्टीस पडतात असा अत्यंत उत्तम योग मी तुला सांगतो ऐक. त्या योगाचं महात्म्य असं की, ज्याच्या नुसत्या श्रवणाने पापांपासून व भवसागरापासून प्राणी मुक्त होतो. एखाद्याने सत्पुरुषांची गाठ पडावी अशी इच्छा व्यक्त करणे, त्यासाठीची पात्रता जाणून घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट आहे हे इथं लक्षात येते. सगळ्यांनाच असं वाटतं असं नाही. त्यासाठी पूर्वजन्मीचे सुकृत असावे लागते. सत्पुरुषांची गाठ पडावी असं वाटायला लागलं की, ते इथून पुढं त्या व्यक्तीचं कायमचं भलं होण्याच्या दृष्टीने त्याने टाकलेलं पहिलं पाऊल असतं पण मनात आलं आणि भेट झाली असं कधी घडत नाही कारण कुणाही थोर माणसाची सहजासहजी भेट होत नाही. अशी भेट घडण्यासाठी ज्याला भेट घ्यायची इच्छा झाली आहे त्याच्या अंगी काही पात्रता असणं आवश्यक आहे.

ईश्वरसुद्धा आपल्या भक्ताला भेटायला खूप उत्सुक असतो पण मनुष्य एक असा प्राणी आहे जो मातेच्या गर्भात असताना सोहम म्हणजे मी ईश्वरच आहे असं म्हणत असतो पण गर्भातून बाहेर आला की मायेनं वेढला गेल्यामुळे कोहम म्हणू लागतो. मातेच्या गर्भात कोंडल्या गेलेल्या जीवाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, निरोधे पचे कोंडले गर्भवासी अधोमुख रे दु:ख त्या बाळकासी अशा खाली डोके आणि वर पाय अशा अवस्थेत ते बालक मातेच्या गर्भात कोंडले गेलेले असल्याने येथून मला सोडवा अशी देवाची काकुळतीला येऊन विनवणी करत असते परंतु बाहेर आल्यावर मी म्हणजेच हा देह अशी खात्री झाल्यामुळे स्वत:पुढे त्याला देवाचं काहीच महत्त्व वाटत नाही. परिणामी आपण ज्याचा अंश आहोत त्या ईश्वराची आणि आपली भेट व्हावी असं वाटणं मग दूरच राहतं. त्यामुळे एखाद्याला आपली ईश्वराशी भेट व्हावी असं वाटू लागलं तर ईश्वराला त्या भक्ताची फार अपूर्वाई वाटते पण नुसती भेटीची इच्छा होऊन काम भागत नाही. अशी भेट होण्यासाठी भक्ताच्या अंगी काही पात्रता येणं आवश्यक असतं. त्यातही गंमत अशी आहे की, आवश्यक पात्रता ज्याच्या अंगी आली असेल त्याला सत्पुरुष स्वत:हून भेटतात. त्यांना भेटण्यासाठी त्याला उठून कुठंही जावं लागतं नाही इतकं पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीचं महत्त्व आहे असं म्हंटलं तरी चालेल. त्याबाबत पुढील श्लोकापासून बाप्पा सांगतायत. किंबहुना असंही म्हणता येईल की, गणेशगीतेचं मुख्य प्रयोजन या पात्रतेविषयी सविस्तर सांगणं आणि नंतर ती कशी साध्य करावी ह्याबद्दल मार्गदर्शन करणं हेच आहे. बाप्पा म्हणाले,

Advertisement

शिवे विष्णौ च शक्तौ च सूर्ये मयि नराधिप ।

या भेदबुद्धिर्योग: स सम्यग्योगो मतो मम ।।21।।

अर्थ- हे राजा, शिव, विष्णु, आदिशक्ति (देवी), सूर्य आणि मी यांचे ठिकाणी भेदबुद्धि नसणे हा जो योग तोच उत्तम योग असे माझे मत आहे.

विवरण- बाप्पा म्हणतायत, ज्याला शिव, विष्णू, देवी, सूर्य आणि मी एकच आहोत अशी खात्री पटली आहे त्याच्या अंगी माझी भेट घेण्याची पात्रता आली आहे असं समजायला हरकत नाही. प्रत्येकाचे स्वत:चे आवडते असे एक उपास्य दैवत असते. कुणाला कृष्ण आवडत असेल, कुणाला राम तर कुणी देवीचा भक्त असेल. त्या प्रत्येकाला आपले आवडते दैवत सर्वश्रेष्ठ वाटत असते. वास्तविक पाहता ही सर्व एकाच ईश्वराची सगुण रूपे आहेत आणि त्यांची निर्मिती करून त्यांना परमेश्वराने निरनिराळी कामे नेमून दिलेली आहेत. ते करत असलेल्या निरनिराळ्या कामाच्या आवश्यकतेनुसार त्यांचे आकार वेगवेगळे आहेत पण जे हे समजून घेत नाहीत त्यांचे आपापसात वाद होतात आणि तिथंच अडकल्यामुळे अशांची पुढं प्रगती होत नाही. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा ईश्वरी खेळ आहे आणि तो व्यवस्थित चालू रहावा म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या रुपात बाप्पा कार्य करत असतात. हे जाणणे हेच ब्रह्मज्ञान होय.

क्रमश:

Advertisement
Tags :

.