दोन हजार वर्षांपूर्वीच्या शहराचा शोध
दक्षिण अमेरिकेत जगातील सर्वात मोठे वर्षावन आहे. ते अमेझॉन वर्षावन म्हणून ओळखले जाते. त्याला जगाचे फुप्फुस अशीही संज्ञा आहे. या वनाच्या डोंगरी प्रदेशात एका प्राचीन शहराचा शोध नुकताच लागला आहे. हे शहर किमान 2 हजार वर्षांपूर्वीचे असावे, असे प्राथमिक संशोधनातून दिसून येत आहे. अँडीज पर्वतरागांच्या पायथ्याशी ते वसविण्यात आले होते. आता या पुरातन शहरावर मोठ्या प्रमाणात संशोधन केले जात आहे. हे शहर दक्षिण अमेरिकेत 600 वर्षांपूर्वी अस्तित्वात असणाऱ्या इंका संस्कृतीतील शहरांपेक्षाही अधिक जुने आहे.
सध्याच्या इक्वेडोर देशात या शहराचा शोध लागला आहे. 2 हजार वर्षांपूर्वी या शहरात दहा हजारांहून अधिक लोक रहात असावेत. या शहरात आखीव मार्ग, लागून लागून असणारी घरे, नदीचे कालवे, शेती, बाजारपेठा, देवस्थाने, अध्ययन केंद्रे, मनोरंजनाचे केंद्रे आदी सर्व सोयी आणि सुविधा होत्या असे दिसून आले आहे. या शहराचे संशोधन आकाशातून क्ष किरणांच्या साहाय्यानेही पेले जात आहे. या शहरातील मार्ग अतिशय सरळ होते. सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था होती. यावरुन त्या काळातही शहर स्थापना करण्याचे शास्त्र किती प्रगत अवस्थेत होते याची कल्पना येते. या शहरात ‘उपानो’ जमातीच्या लोकांची वस्ती होती, असे दिसून येत आहे. तथापि, या भरभराटीला आलेल्या शहराची नंतर शोकांतिका झाली, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
हे ‘उपानो’ लोग आणि हे शहर इसवी सन 300 ते 600 या कालावधीत रहस्यमयरित्या गायब झाले. त्यानंतर साधारणत: 200 वर्षांनी येथे हुआपुला संस्कृतीच्या लोकांनी वस्ती केली. ती दक्षिण अमेरिकेत युरोपियन लोकांचा प्रवेश होईपर्यंत, अर्थात इसवीसन 1,400 पर्यंत टिकून होती. जसजसे या शहराचे अधिक संशोधन होईल, तसतसा अनेक रहस्यांचा भेद होईल, असे मत आहे.