सुवर्णक्षणांची ओळख
परंतु ते अळवावरच्या पाण्यासारखे कधी आयुष्यातून निसटून जातात ते त्याला कळतसुद्धा नाही. संतचरित्रे वाचताना कळते की संतांच्या आयुष्याची वाट मोक्षपथाकडे वळली कारण भगवंतांनी दिलेले सुवर्णक्षण होते. ते त्यांनी ओळखले होते. संतांचा जीवनपट समजून घेताना कळते की त्यांनी आयुष्याचे सोने समाजाच्या उद्धारासाठी समाजाला सढळ हस्ते वाटून टाकले.
णसाच्या आयुष्यात काही सुवर्णक्षण असतात. ते तो जन्मभर सांभाळून ठेवतो. त्याची आठवण तो कधीच विसरत नाही. कारण सुवर्ण कधी कुजत, नासत नाही. उलट बरेचदा त्या सुवर्णक्षणांचे दागिने करून माणूस ते अलंकार समाजासमोर मिरवत असतो. सर्वसामान्यत: त्यात मान, सन्मान, पुरस्कार, बढती यांची चलती असते ना! खरे म्हणजे स्वत्व जागृत करून आयुष्य बदलून टाकणारे सुवर्णक्षण तो परमात्मा माणसाला प्रदान करीत असतो. परंतु ते अळवावरच्या पाण्यासारखे कधी आयुष्यातून निसटून जातात ते त्याला कळतसुद्धा नाही. संतचरित्रे वाचताना कळते की संतांच्या आयुष्याची वाट मोक्षपथाकडे वळली कारण भगवंतांनी दिलेले सुवर्णक्षण होते. ते त्यांनी ओळखले होते. संतांचा जीवनपट समजून घेताना कळते की त्यांनी आयुष्याचे सोने समाजाच्या उद्धारासाठी समाजाला सढळ हस्ते वाटून टाकले.
संत तुकाराम महाराजांचे चरित्र वाचताना माणूस त्यांच्या आयुष्याशी समरस होतो. त्याला वाटते, तुकाराम महाराज आपल्यातलेच एक आहेत. आपले विचार, विकार घेऊन त्यांची अभंगवाणी प्रकटते. त्यांनाही चारचौघांसारखेच प्रपंचाचे भोग भोगावे लागले. जिवलगांचे विरह, दु:ख अनुभवावे लागले म्हणून तुकाराम महाराजांची वाणी सहजपणे समाजाच्या मुखात येते. मात्र माणूस जेव्हा साधक, भक्त होऊन संत तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा अभ्यास करतो तेव्हा त्याला कळते की ही ब्रह्मांड उजळून टाकणारी शलाका आहे. हिचा उजेड आपण पेलू शकत नाही. आपल्या हाती आले आहेत ते फक्त प्रकाशाचे काही कवडसे. त्यात स्वत:चा शोध घ्यायचा आहे. संत तुकारामांचे घर वैभवसंपन्न होते. त्यांचा मोरे परिवार समृद्ध, श्रीमंत होता. त्यांचे वडील सावकार होते. लोकांना कर्ज देत होते. देहू गावाचे महाजनपण त्यांच्याकडे होते. प्रतिष्ठा होती. घर मौल्यवान वस्तूंनी सजलेले होते. संत तुकाराम महाराज हुशार, व्यवहारदक्ष आणि प्रतिभासंपन्न होते. व्यासंगी होते. दुर्दैवाने दुष्काळ पडला आणि महाराजांचे आयुष्य बदलून गेले. आयुष्यात फार मोठे स्थित्यंतर घडले. अन्नपाण्याविना तडफडणारे लोक त्यांनी सभोवती बघितले आणि मुळातच करुणेने भरलेले हृदय रंजल्यागांजल्यांसाठी तळमळू लागले. दुष्काळ हा त्यांच्या आयुष्यातला सुवर्णक्षण ठरला. जीवनाची परवशता कळली व भौतिक सुखाची क्षणभंगुरता लक्षात आली. दुष्काळाने ऐहिक श्रीमंती नष्ट केली आणि विरक्ती हे धन महाराजांना बहाल केले. स्वत्वाचा विकास होऊन आत्मभान जागे झाले. पूर्वपुण्याई कामी आली. ‘तुका म्हणे संत सेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा’ तुकाराम महाराजांच्या अंत:करणाला अभंगवाणीचा पाझर फुटला. ‘बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ।अनुतापे तुझे राहिले चिंतन । झाला हा वमन संवसार ।’ आयुष्यात हा क्षण त्यांनी गोठवून ठेवला.
संत तुकारामांची पत्नी आवली मोठ्या धनाढ्या घराण्यातील होती. माहेरून ती दागदागिन्यांनी सजून सासरी आली होती. परंतु दुष्काळात चाऱ्यापाण्याविना तडफडणारी जनावरे तिने पाहिली, माणसे भुकेने तळमळून मरताना बघून आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेवून तिने तिच्या सोन्याचे गोठ, पाटल्या, पुतळ्या, वळी, अंगठ्या, तोडे जे जे म्हणून होते ते तुकोबांपुढे आणून टाकले. विठ्ठल विठ्ठल नाम सदैव गाणाऱ्या पतीला बजावले की ही पंचक्रोशीतली माणसे जगावी म्हणून जसे तुम्ही धडपडता तसे घरच्या माणसांकडेही बघा. स्त्राrला सोन्यांच्या दागिन्यांची आवड नैसर्गिक, सहजसुलभ असते. तशी तिलाही होती. परंतु जेव्हा छत्रपती शिवराय संत तुकारामांचे भक्त बनले आणि त्यांनी सेवकांकरवी तुकोबांना नजराणा पाठवला, त्यात चांदीच्या ताटातून सोन्याच्या मोहरा आणि दागदागिनेही पाठवले. आवली हरखून गेली. मात्र आपल्या पतीने तो नजराणा परत पाठवल्यावर त्याकडे तिने ढुंकूनही पाहिले नाही. तिच्या वाटेला आलेल्या दु:खाचे तिने सोने केले. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘मृत्युलोकी आम्हा आवडती परी । नाही एका हरिनामेवीण ।सोने रुपये आम्हा मृत्तिकेसमान । माणिक पाषाण खडे जैसे?
आम्हाला सोने, चांदी माती सारखे आणि हिरे, माणिक, मोती, दगड खड्यासारखे भासतात. नरदेहाचे सोने कसे करायचे हे संत तुकाराम महाराजांनी आपल्या अथांग अभंगवाणीतून समाजाला शिकवले. विश्वपिता श्री पांडुरंगाच्या मंदिरात जाताना प्रथमत: भक्त गरुडखांबाला वंदन करतात. हा खांब ज्यांच्या नावाने ओळखला जातो ते कर्नाटकातील थोर संत, कवी पुरंदरदास होत. त्यांच्या आयुष्यात पांडुरंगकृपेने सुवर्णक्षण आला आणि त्यांचे आयुष्य उजळवून गेला. त्यांचे नाव श्रीनिवास उर्फ तिमप्पा होते. व्यास राय या आपल्या गुरूंकडून दीक्षा घेतल्यावर त्यांचे नाव पुरंदरविठ्ठल झाले. त्यांच्याच मठातील एका संतांनी त्यांना पुरंदरदास म्हटले आणि पुढे तेच रूढ झाले. त्यांचे घराणे श्रीमंत होते. घरी सराफीचा व्यवसाय होता. पुढे पुरंदरदासांनी तो वाढवला. ते कुशल रत्नपारखी होते. त्यांची पत्नी सरस्वतीबाई ही साध्वी, सात्विक स्त्राr होती, देवभोळी व उदार होती. मात्र पुरंदरदास कमालीचे कंजूष होते. त्यांचा उद्धार व्हावा म्हणून पांडुरंग वृद्ध व्यक्तीच्या रूपाने त्यांच्या घरी एकदा पेढीवर आला आणि मुलाच्या मुंजीसाठी मदत मागू लागला. पुरंदरदासांनी उद्या ये, परवा ये करत सहा महिने चालढकल केली तेव्हा तो वृद्ध गृहस्थ पुरंदरदासांच्या घरी गेला आणि त्यांची पत्नी सरस्वती हिच्याकडे त्याने मदतीची याचना केली. तिच्या हृदयात करुणा उत्पन्न झाली. परंतु पतीच्या परवानगीशिवाय ती काहीही करू शकत नव्हती म्हणून तिने स्त्राrधन असलेली स्वत:ची सोन्याची नथ त्याला देऊन टाकली. ती नथ घेऊन तो वृद्ध गृहस्थ पुरंदरदासांकडेच पेढीवर विकायला गेला. नथ बघून पुरंदरदासाने क्षणात ओळखले की ही आपल्या पत्नीची नथ आहे. त्याने ती तिजोरीत नीट ठेवून दिली व घरी गेला. पत्नीच्या नाकात नथ नव्हती. त्यांनी तिला विचारले असता ती खूप घाबरली व आता आपले काही खरे नाही असे समजून तिने जीव देण्याचे ठरवले. परंतु प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याकडे याचक म्हणून आला होता. त्याने तिला ती नथ चमत्काराने परत केली. पुरंदरदास नथ बघून चकित झाले. तिजोरीतील नथ परत घरी पत्नीजवळ कशी हे त्यांना कळेना. पत्नीने खुलासा करताच प्रत्यक्ष परमात्म्याला आपण गेले सहा महिने विन्मुख पाठवले हे जाणून त्यांनी स्वत:चा धिक्कार केला. पश्चातापाने त्यांची वृत्ती पालटली. एक पैसा दान न करणाऱ्या पुरंदरदासाने स्वत:ची संपूर्ण संपत्ती एका क्षणात दान करून टाकली. पत्नीने त्याचे डोळे उघडले. आपले सर्व सोन्याचे दागिने अंगावरून उतरवत तिने पतीजवळ देऊन म्हटले, ‘किती दिवस या संपत्तीचा लोभ करायचा? मृत्यू प्रत्येकाला रिक्त हस्तेच घेऊन जाणार आहे. नरदेहाचे सोने करणाऱ्या परमेश्वराचे नाम ही संपत्तीच खरी मोठी आहे. साक्षात विठ्ठल आपला उद्धार करायला आला आणि त्याला आपण तसेच रिकामे हाताने पाठवले.’ या पश्चात्तापाने पुरंदरदासाने आपली संपूर्ण संपत्ती गरिबांना वाटून भिक्षेची झोळी हाती घेऊन ते हरिदास झाले. पुरंदरदास हे एक ज्येष्ठ संगीततज्ञ होते. त्यांनी विपुल अशी काव्यरचना केली. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ हे त्यांचे कन्नड पद महाराष्ट्रातही लोकप्रिय आहे.
असे म्हणतात की कलियुगात माणसाचे मन अंतकाळी सोन्यामध्ये अडकते. जीवनात आलेले सुवर्णक्षण ओळखले तर रामनामाचे सोने गवसते आणि खऱ्या सुवर्णाची ओळख पटते. अर्थात गवसलेले हरवायला नको म्हणून त्या परमात्म्याची कृपाही लागते.
स्नेहा शिनखेडे
