एक ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच; ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी आता एनएमएमसी कार्ड अनिवार्य
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभघेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून एनएमएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना एनएमएमसी कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला असून, त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार आणि बसस्थानकांवर सुरू करण्यात आली आहे.
एसटी महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ, डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी एनएमएमसी कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे.
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट एनएमएमसी कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी त्यापूर्वी एनएमएमसी कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कार्यरत एनएमएमसी कार्ड आहे किंवा कार्ड नोंदणी केल्याची कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे. विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना एनएमएमसी कार्ड नोंदणी केल्यानंतर मिळालेली क्युआर कोडयुक्त पावती वाहकाच्या ईटीएम मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असल्याचे सांगण्यात आले.
१ ऑक्टोबरपूर्वी कार्ड नोंदणी करून घ्या
आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या ओटीपीच्या आधारे एनएमएमसी कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी कार्ड नोंदणी करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.