नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून भाजपमध्ये नाराजी
वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करता यादी अंतिम केल्याने असंतोष
प्रतिनिधी/ बेंगळूर
प्रदेश भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले असून नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीबाबत वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीदरम्यानही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतरही भाजपमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार सदानंदगौडा आणि ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या यादीवर आवाज उठविला असून माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या निकटवर्तीयांना प्राधान्य देण्याच्या वरिष्ठांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करता यादी अंतिम करण्यात आल्याचा संताप व्यक्त करत या दोन्ही नेत्यांनी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या निकटवर्तीयांना अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. यादी जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय नेत्यांनी राज्यात येऊन कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा करून वरिष्ठांचे मत विचारात घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करायला हवी होती, असे मत व्यक्त केले जात आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांची केजेपी-2 यादी : यत्नाळ
भाजपमधील येडियुराप्पा विरोधी गोटात स्वत:ची ओळख निर्माण करणारे आणि वेळ मिळेल तेव्हा येडियुराप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जोरदार टीका करणारे ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची यादी पाहिली तर केजेपी-2 ची (कर्नाटक जनता पक्ष) यादी दिसत आहे, असा टोला लगावला आहे. येडियुराप्पा केजेपी-1 तर त्यांचा मुलगा केजेपी-2 आहे. नातू आल्यास केजेपी-3 होईल, असे म्हणत यत्नाळ यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या यादीबद्दल आक्रोश व्यक्त केला. तसेच या यादीचे आयुष्य 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आहे, असेही म्हटले आहे.
ज्येष्ठांशी चर्चा करायला हवी होती : सदानंदगौडा
नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत भाष्य करताना माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी, हा असमर्थ संघ असल्याचे सांगत नाही. कुठेतरी फरक आहे. हायकमांडने राज्यात येऊन निर्णय घ्यायला हवा होता. दक्षिण कर्नाटकाला अधिक प्राधान्य मिळाले आहे. उत्तर कर्नाटकाला योग्य प्राधान्य देण्यात आलेले नाही, असे बोलले जात आहे. हे सर्व करण्यापूर्वी केंद्रातील नेत्यांनी येऊन राज्यातील ज्येष्ठांशी बसून चर्चा करायला हवी होती, असे त्यांनी सांगितले.
नाराज होणे स्वाभाविक : येडियुराप्पा
प्रदेश भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीदरम्यान सर्व बाबी लक्षात घेऊन ही यादी जाहीर करण्यात आली आहे. चांगल्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. नाराज होणे स्वाभाविक असून भविष्यात सर्व काही ठीक होईल, असे माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले. दावणगेरे येथे पत्रकारांशी बोलताना, आमदार बसनगौडा पाटील यांच्या वक्तव्याबाबत आपण काहीही बोलणार नाही. तसेच त्यांच्याविरोधात हायकमांडकडे तक्रार करण्याचा प्रयत्नही करणार नाही, सर्व काही ठीक होईल, असे त्यांनी सांगितले.
अधिकाधिक तरुणांना प्राधान्य : बी. वाय. विजयेंद्र
विविध समाज, जाती-जमाती, मुंबई कर्नाटक, कित्तूर कर्नाटक, कल्याण कर्नाटक यासह सर्व भाग ओळखून नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिली. पत्रकारांशी ते बोलत होते. अधिकाधिक तरुणांना प्राधान्य दिले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही पक्षाने संधी दिली आहे, असेही ते म्हणाले.