For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | वीज कनेक्शन तोडणे पडले महागात; वायरमनला आधी मारहाण, नंतर बाटलीने डोक्यात घाव

04:03 PM Sep 02, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   वीज कनेक्शन तोडणे पडले महागात  वायरमनला आधी मारहाण  नंतर बाटलीने डोक्यात घाव
Advertisement

कराड : वीज कनेक्शन तोडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या बाह्यस्त्रोत वायरमनला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याचा तसेच काही तासांनी रस्त्यात अडवून काचेच्या बाटलीने डोक्यात मारून जखमी केल्याचा प्रकार काशीळ (ता. सातारा) येथे घडला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवतेज संजय जाधव (वय २६, रा. अतीत, ता. सातारा) असे जखमी वायरमनचे नाव आहे. त्यांनी याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, लंकेश मोहनकांबळे (रा. काशीळ, ता. सातारा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास महावितरण शाखा अतीत येथील बाह्यस्त्रोत वायरमन शिवतेज जाधव हे काशीळ येथील संतोष श्रीरंग कांबळे यांच्या घराबाहेर वीज कनेक्शन बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयिताने वीज कनेक्शन खांबावरून तोडू नये, असे म्हणत जाधव व त्यांच्या स्टाफसोबत शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच स्टाफच्या अंगावर धावून जाऊन शिवतेज जाधव यांना हाताने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे
फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काशीळ गावच्या कमानीजवळ संशयिताने स्विफ्ट कार आणून शिवतेज जाधव यांच्या समोर आडवी लावली. त्यांच्या मोबाईलमध्ये घटनेचे शूटिंग असल्याचा आरोप करत संशयिताने कारमधून काचेची बाटली काढली. 'आमचे वीज कनेक्शन तू का बंद केलेस?' असे म्हणत शिवीगाळ करून हातातील बाटली जाधव यांच्या डोक्यात मारली. यामध्ये जाधव जखमी झाले. शिवतेज जाधव यांच्या फिर्यादीवरून लंकेश मोहन कांबळे याच्याविरूद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.