For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संवेदनशील मतदारसंघात शिस्तबद्ध मतदान

10:55 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
संवेदनशील मतदारसंघात शिस्तबद्ध मतदान
Advertisement

शहराच्या मध्यवर्ती भागातील संवेदनशील मतदार केंद्रांवर चोख बंदोबस्त : राखीव दलाच्या तुकड्यांची नियुक्ती 

Advertisement

बेळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये विभागल्या गेलेल्या बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. या विधानसभा मतदारसंघात शहरातील मध्यवर्ती भागातील संवेदनशील मतदान केंद्रे असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले. खडक गल्ली, भडकल गल्ली, खंजर गल्ली, चांदू गल्ली, चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, कसाई गल्ली, जालगार गल्ली, गांधीनगर, न्यू गांधीनगर आदी संवेदनशील भागामध्ये अधिक पोलीस बंदोबस्तासह राखीव दलाच्या तुकड्यांची नियुक्ती केली होती. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाल्यानंतर मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. 11 वाजेपर्यंत मतदारांनी मतदान घालण्यास रांगा लावल्या होत्या. त्यानंतर उन्हाची तीव्रता वाढत गेल्याप्रमाणे मतदारांची संख्याही रोडावल्याचे चित्र दिसून आले. तर या मतदारसंघात येणाऱ्या महांतेशनगर, शिवाजीनगर, रामनगर, रामतीर्थनगर, श्रीनगर, माळमारुती, रुक्मिणीनगर, ऑटोनगर, कणबर्गी, बसवण कुडची, सदाशिवनगर, शाहूनगर, आझमनगर, मारुतीनगर, वैभवनगर, हनुमाननगर या भागामध्ये सकाळपासूनच मतदारांनी केलेली गर्दी दुपारी उशिरापर्यंत कायम होती. उपनगरांमध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केल्याचे चित्र निदर्शनास आले. मतदारांना मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांकडूनही प्रोत्साहित करण्यात येत होते. रिक्षा, दुचाकी, कार आदी वाहनांच्या माध्यमातून मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत नेण्यात येत होते. सदाशिवनगर येथे सखी मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. गुलाबी रंगाने मतदान केंद्र रंगविण्यात आले होते. पांढऱ्या व गुलाबी रंगांच्या फुग्यांनी दर्शनी कमान उभारण्यात आली होती. तर मतदान करून बाहेर पडणाऱ्या मतदारांसाठी सखी सेल्फीची सोय करण्यात आली होती. अनेक महिला मतदानानंतर सेल्फी घेण्यात मग्न असल्याचे दिसून आले. उत्स्फूर्तपणे मतदान करून इतर मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत महांतेशनगर येथील मतदान केंद्रात 42 टक्के मतदान झाले होते. तर कणबर्गी येथील मतदान केंद्रात सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. रखरखत्या उन्हातही मतदारांनी प्रतिसाद दर्शविला. त्यामुळे दुपारी 1 वाजता याठिकाणी 45 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. अशीच स्थिती रामतीर्थनगर येथील मतदान केंद्रावर दिसून आली. 1.30 च्या दरम्यान या मतदान केंद्रावर 45 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. शाहूनगर येथील मतदान केंद्रावर 3 वाजता 56 टक्के मतदान झाले होते. सदाशिवनगर येथील मतदान केंद्रात दुपारी 4 च्या दरम्यान 55 टक्के मतदान झाले. शहरातील खंजर गल्ली, खडक गल्ली, जालगार गल्ली, शेट्टी गल्ली येथील मतदान केंद्रांवर सकाळच्या टप्प्यात 40 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. तर कोनवाळ गल्ली येथील मतदान केंद्रावर दुपारी 4 वाजता 70 टक्के मतदान झाले होते. निवडणूक अधिकाऱ्यांकडून दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या टप्प्यात मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने दुपारच्या टप्प्यात मतदान थंडावले होते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केल्याचे सांगण्यात आले. गांधीनगर, न्यू गांधीनगर येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी सकाळच्या टप्प्यातच गर्दी केली होती. दुपारी मतदारांची संख्या कमी असली तरी मतदान प्रक्रिया मंदगतीने सुरू होती. बसवण कुडची येथील मतदारांनी सकाळी मोठी गर्दी केली होती. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र, राजकीय नेत्यांकडूनच वादावादीवर पडदा टाकण्यात आला. उन्हाच्या तीव्रतेपासून मतदारांना दिलासा मिळावा यासाठी सावली नसलेल्या मतदान केंद्रांसमोर मंडप घालून सावलीची व्यवस्था केली होती. वृद्ध व दिव्यांगांना मतदान केंद्रांवर व्हीलचेअरची सोय केली होती.

Advertisement

कणबर्गी येथे दोन गटात राडा...

दिवसभर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. सायंकाळच्या दरम्यान कणबर्गी येथील मतदान केंद्रावर दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याची घटना घडली. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असल्याने अधिक पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. माळमारुती पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेऊन बंदोबस्त वाढविल्याचे समजते.

महिला मतदारांची पाण्यासाठी धावाधाव

शहरातील मध्यवर्ती भागामध्ये तब्बल 12 दिवसांनंतर पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदान घालण्यासाठी गेलेल्या महिला मतदारांना पाण्यासाठी परत यावे लागले. बऱ्याच दिवसांनंतर पाणी आल्याने मतदान केंद्रावर महिलांची गर्दी दिसून आली नाही. पाणी भरून झाल्यानंतर सायंकाळच्या टप्प्यात महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी महिला मतदारांतून पाण्याच्या गैरसोयीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शहरवासियांना मुबलक पाण्याची सोय करून द्यावी, अशी प्रतिक्रियाही महिला मतदारांकडून व्यक्त करण्यात आली.

Advertisement
Tags :

.