सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, शिस्तभंग नोटीस आता E-mail, Whatsapp वर दिली जाणार
या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक जाहीर केले आहे.
रत्नागिरी : विविध विभागांमध्ये काम करणारे राज्य सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्या विरोधातील शिस्तभंग कारवाईसाठी व्हॉटस्अॅप, इमेलद्वारे नोटीसा बजावण्यात येणार आहेत. या संदर्भात राज्य सरकारने एक परिपत्रक जाहीर केले आहे.
शासकीय कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या शिस्तभंग कारवाईमध्ये प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी तसेच खर्चात बचत करण्यासाठी आधुनिक संवाद माध्यमांचा उपयोग करण्याचे सरकारने ठरवले आहे. सध्या दोषारोपपत्रज्ञापन, चौकशी अहवाल, व्यक्तीश: किंवा नोंदणीकृत डाकेने पाठवला जातो. यामध्ये बराच वेळ जातो.
यातून मार्ग काढण्याचे राज्य सरकाने ठरवले आहे. शासकीय कर्मचारी कर्तव्यावर उपस्थित असल्यास शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्याने संबंधित कागदपत्रे आणि पत्रव्यवहार व्यक्तीश: कर्मचाऱ्याला द्यावा किंवा त्याच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देण्याची कार्यवाही व्हावी. संबंधित कर्मचाऱ्याला नोंदणीकृत डाकेने कागदपत्रे पाठवावीत.
कर्मचाऱ्याने आपले म्हणणे सादर करण्यास पुरेसा वेळ मिळावा, यासाठी शासकीय मेल आयडीने संबंधितांना मेल पाठवावा. शासनाने सूचना दिल्या आहेत की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्हॉटस्अॅपवरही कागदपत्रे पाठवता येतील. कागदपत्रे मिळाल्याची पोच संबंधित कर्मचाऱ्याने व्हॉटस्अॅपवर देणे बंधनकारक आहे. शासनाने या सूचना दिल्यामुळे नोटीस बजावणीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.