Sangli : सांगली महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई
नागरिकांच्या कामकाजात ढिलाई करणाऱ्यावर सत्यम गांधींचा इशारा
सांगली : कामकाजात हलगर्जीपणा, निष्काळजीपणा आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. बांधकाम विभागातील दोन शाखा अभियंते तत्काळ निलंबित केले असून, नगररचना व बांधकाम विभागातील दोन अधीक्षकांची वेतनवाढ रोखली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
विभागप्रमुखांच्या बैठकीत ही कारवाई केली. शासकीय पत्रव्यवहार, लोकायुक्त प्रकरणे, मुख्यमंत्री सचिवालयातील संदर्भ, विधानसभा प्रश्नांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. संबंधित अधीक्षकांना प्रलंबित कामांची माहिती नव्हती. विचारलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिले नाही. त्यांना कर्तव्याची जाणीव नसल्याचे व हलगर्जीपणा केल्याचे आढळले. अधीक्षक कार्यालयाचा केंद्रबिंदू आहे, असे निरीक्षण नोंदवले.
गांधी यांनी नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ च्या नियम ३ (१) (२) तसेच महापालिका अधिनियम तरतुदींनुसार कारवाई केली आहे बांधकामकडील शाखा अभियंता पंकजा अरविंद रुईकर, दुसरे शाखा अभियंता आलम अजीज अत्तार यांनाही तत्काळ निलंबित करण्यात आले. नगररचना व बांधकाम विभागाच्या दोन अधीक्षकांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली.
रुईकर व अत्तार यांनी कार्यपद्धतीनुसार काम न करणे, विनापरवाना गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या सूचनेशिवाय कार्यात ढिलाई केल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. त्यांचे कामकाज असमाधानकारक ठरल्याने त्यांना निलंबित केले आहे. नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे आणि प्रशासकीय शिस्त राखणे ही कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. यापुढे हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास कठोर शिस्तभंगाचीकारवाई करण्यात येईल, असा इशारा
आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला.