मान्सून पूर्व पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
गेल्या आठ दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभर ढगाळ वातारणामुळे पावसाची चाहूल लागली आहे. यंदा पवसाचे आगमन लवकर होणार असुन 100 टक्के पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र मान्सूनच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. यंदाचा पावसाळा गेल्या वर्षीप्रमाणेच आव्हानात्मक ठरू शकतो, त्यामुळे सर्वच जण कसून तयारी करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
शेतीच्या कामासाठी पूरक वातारण निर्माण झाले असल्यामुळे शेतकऱ्यांकडून शिवारात मशागत, कोळपणी, पेरणीसाठी धांदल सुरू आहे. शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, खते, औषधे व यंत्र सामुग्री खरेदीसाठी शहरातील खत दुकानांमध्ये गर्दी होत आहे. ग्रामीण भागात कौलारू घरांच्या शेखरणी तर शहरी भागात घराची दुरूस्ती, डागडूजीकरण, पत्रे बदलणे, प्लास्टिक कागदांची जुळावणीची लगबग पहायला मिळत आहे. पावसापूर्वीच पालकांकडून शालेय साहित्य खरेदी केली जात आहे. तर छत्री, रेनकोट, पावसाळी शूजच्या खरेदीसाठी शहरीतील दुकाने गर्दीने फुलली आहेत. प्रशासन स्तरावरही जोरदार तयारी सुरू असुन आपत्ती व्यस्थापनासह जिल्हा, महापालिका, नगरपालिका आरोग्य विभाग सज्ज झाला आहे.

मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह धुवाधार पावसाने चांगलेच झोडपले. अद्यापही पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील सखल भागात पाणी साचून राहीले. तर बहुतांश परिसरातील प्रमुख रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. पन्नासहून अधिक झाडे कोसळ्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. या सर्वच पार्श्वभुमीवर पावसाचा सामना करण्यासाठी नागरिकांसह प्रशासनाची धांदल सुरू आहे.
- पोषक वातावरण अन् शेतकऱ्यांची धांदल...
शेतकरी सध्या मशागत, पेरणी आणि कोळपणीच्या कामात व्यस्त आहेत. बाजारात बियाणे, खते आणि कीटकनाशकांची खरेदी करण्यासाठी गर्दी उसळली आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. भात, सोयाबीन, मका यांसारख्या पिकांसाठी दर्जेदार बियाण्यांची मागणी वाढली आहे. यंदा पाऊस चांगला होईल, अशी आशा आहे. त्यामुळे वेळेत पेरणी पूर्ण करायची आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खणणे, बांध मजबूत करणे यासारखी कामेही वेगाने सुरू आहेत.
- शालेय साहित्य, छत्री, रेनकोट खरेदीसाठी गर्दी
पावसाळ्यापूर्वी शालेय साहित्य खरेदीची लगबगही वाढली आहे. पुस्तके, वह्या, रेनकोट आणि छत्र्यांची खरेदी जोरात आहे. महाद्वार रोड, पापाची तिकटी, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, पद्मा टॉकीज चौकात छत्री दुरुस्ती करणाऱ्यांची दुकाने गजबजली आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी पालकांना साहित्य खरेदीची घाई आहे. रेनकोट आणि वॉटरप्रूफ बॅग्जलाही मोठी मागणी आहे.
- प्रशासनाची तयारी
मनपा प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच गटारे, नाले यांचा गाळ काढण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. पंचगंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये पूरनियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आपत्ती व्यवस्थापन पथकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, बोटी, दोरखंड, लाईफ जॅकेट्स यांचा साठा तपासला गेला आहे.
- आरोग्य यंत्रणा अलर्ट
आरोग्य यंत्रणा सतर्क असून, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधांचा साठा आणि फवारणीची तयारी पूर्ण झाली आहे. पूर आणि साथरोग दोन्हींना तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. पाणीपुरवठा स्वच्छ राहावा यासाठी पाण्याच्या टाक्यांची तपासणी आणि क्लोरिनेशनही सुरू आहे.
- आपत्ती विभाग सज्ज
गेल्या काही वर्षांत पूरस्थिती गंभीर राहिली आहे. त्यामुळे यंदा आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर आहे. तात्पुरते निवारे, अन्नधान्याचा साठा आणि बचाव पथकांची तयारी पूर्ण झाली आहे. पूरग्रस्त भागातून नागरिकांना हलवण्यासाठी बस आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. नागरिकांनीही सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.