For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यातील हॉटेल व्यावसायिकांवर आपत्ती

01:19 PM Apr 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यातील हॉटेल व्यावसायिकांवर आपत्ती
Advertisement

चहा, नाश्ता, जेवणाची दरवाढ होण्याची चिन्हे

Advertisement

पणजी : व्यावसायिक गॅस सिलिंडर रु. 218 अशा भरमसाठ किंमतीने वाढल्यामुळे त्याचा फटका गोव्यातील पर्यटनासह व इतर सर्व क्षेत्रांना बसत आहे. हॉटेल्स आणि बाकीची उद्योग-आस्थापने रेस्टॉरन्टमध्ये मोठी दरवाढ होण्याची चिन्हे असून त्याचे विपरित परिणाम ग्राहकांवरती देखील होणार आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्याच दिवशी म्हणजे शुभारंभालाच हा दरवाढीचा धक्का व्यावसायिकांना आणि उद्योजकांना बसला आहे. चहा, नाश्ता, जेवणाची थाळी आणि इतर सर्व प्रकारचे खाद्य-अन्नपदार्थ महाग होण्याची शक्यता असून ग्राहकांच्या खिशालाही कात्री बसणार, असे दिसून येत आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळणे मुश्किल झालेले असतानाच हा दरवाढीचा भडका उडाल्याने व्यावसायिक-उद्योग आस्थापने हवालदिल आणि हैराण झाल्याचे दिसून येत आहे.

गोव्यात लहान-मोठी

Advertisement

हॉटेल्स-रेस्टॉरन्ट यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सिलिंडरचा वाढीव दर भरून काढण्यासाठी त्यांना विविध अन्न-खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सर्वसामान्य जनतेचे पेय असलेला चहा यापूर्वीच सिलिंडर नसल्यामुळे महाग झालेला असून आता त्याचा दरही वाढणार की काय, असे संकेत मिळत आहेत. आधी चहाचे दर रु. 10 होते ते रु. 15 ते 20 पर्यंत पोहोचले असून त्यात आणखी वाढ होण्याचा संभव दिसून येत आहे. साधी जेवणाची थाळी (शाकाहारी) रु. 150 ते 200 पर्यंत होती ती आता रु. 250 पर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मांसाहारी जेवणाची थाळी तर रु. 300 च्या पुढे केव्हाच गेली असून ती रु. 400 पर्यंत वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत.

सिलिंडर दरवाढीचे परिणाम सर्व स्तरावर होतात आणि महागाई वाढत जाते, असे एकंदरित चित्र आहे. सिलिंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल्स बंद पडली आहेत. त्यात हा दरवाढीचा भडका उडाल्याने हॉटेल्स व्यावसायिकांवर मोठी आपत्ती आल्याचे दिसून येते. त्यामुळे हॉटेल्स व्यवसाय संकटात सापडला असून दरवाढ केल्यास ग्राहक कमी होण्याचाही धोका आहे. त्यामुळे एकंदरित सर्वच व्यावसायिक मोठ्या चिंतेत सापडल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.