For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय कंपाऊंड तिरंदाजांकडून निराशा

06:28 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय कंपाऊंड तिरंदाजांकडून निराशा
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

पदकाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय कंपाऊंड पुरूष आणि महिला संघांना तिरंदाजी विश्वचषकाच्या दुसऱ्या टप्प्यात निराशाजनक कामगिरीला सामोरेजावे लागले. बुधवारी येथे झालेल्या या स्पर्धेत निर्णायक क्षणी पराभव झाल्यामुळे त्यांना पदक मिळवता आले नाही.

महिला संघाचे उपांत्यपूर्व फेरीतच आव्हान समाप्त

Advertisement

सर्वात मोठा धक्का महिला संघाला बसला. ज्यांनी गेल्या महिन्यात मेक्सिको येथे झालेल्या हंगामातीला पहिल्या विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. ज्योती सुरेखा वेन्नम, प्रगती आणि आदिती स्वामी या तिघी उपांत्यपूर्व फेरीत तुर्कीकडून 227-233 ने पराभूत होवून स्पर्धेतून बाहेर पडल्या. भारतीय तिघी हझल बुरून, डेफ्ने चकमक आणि एमिने राबिया ओगुझ यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीशी बरोबरी करु शकल्या नाहीत. या तिघींनी दुसऱ्या एंडपासून नियंत्रण मिळवले आणि आणि शेवटपर्यंत कायम ठेवत सहा गुणांनी सहज विजय मिळवला.

पुरूष संघाला कांस्यपदक जिंकण्यात अपयश

ओजस देवताले, साहिल जाधव आणि कुशल दलाल याच्या पुरूष संघाने उपांत्य फेरी गाठून आशा वाढवल्या होत्या. परंतु ऐन महत्त्वाच्या क्षणी ते अपयशी ठरले आणि दबावाखाली सलग दोन पराभव पत्करुन त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कांस्यपदकाच्या सामन्यात 234-234 अशी बरोबरी झाल्यानंतर झालेल्या नाट्यामय शूट-ऑफमध्ये भारताला चीनकडून पराभव पत्करावा लागला. शूट-ऑफमध्येही दोन्ही संघांचे प्रत्येकी तीन अचूक बाण बरोबरीत होते. परंतु भ्घरताच्या एका बाणाच्या तुलनेत चीनचे दोन बाण केंद्राच्या अधिक जवळ होते. त्यामुळे त्यांनी सामना जिंकला. मध्यंतरी भारत एका गुणाने (118-117) आघाडीवर होता. परंतु शी जिंग्यु, लिऊ जिन्यू आणि ची शियांगशुआ यांनी तिसऱ्या एंडमध्ये झुंजार पुनरागमन करत गुण बरोबरीत आणले. तणावपूर्ण अंतिम एंडमध्ये दोन्ही संघ 58 गुणांवर बरोबरीत होते. ज्यात भारताने दबावाखाली महत्त्वाचे गुण गमावले.

उपांत्य फेरीतील पराभवही तितकाच बोलका होता. पहिल्या तीन एंडमध्ये आघाडीवर असूनही तिसऱ्या मानांकीत भारतीय संघाला सातव्या मानांकीत अमेरिकेकडून 234-225 असा पराभव पत्करावा लागला. 60 गुणांच्या निर्दोष सलामीच्या एंडनंतर भारताने 177-176 अशी आघाडी घेतली होती. परंतु शेवटच्या सहा बाणांमध्ये त्यांना केवळ तीन वेळा 10 गुण मिळवता आले. तर जेम्स लुट्झ, लुईस प्राईस आणि गायस कार्टन यांनी प्रत्येकी पाचवेळा 10 गुण मिळवले.

सलग झालेल्या या दोन पराभावांमुळे निर्णायक क्षणी आपला संयम टिकवून ठेवण्यात भारताला येत असलेले अपयश पुन्हा एकदा उघड झाले आहे. ज्या संघाची पदकांची सर्वात मोठी आशा दीर्घकाळापासून कंपाऊंड प्रकारांवर अवलंबून राहिली आहे, त्यांच्यासाठी ही एक चिंताजनक बाब आहे. आशियाई खेळांना आता चार महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला असताना हे निकाल काही अधिक खोलवर रुजलेल्या समस्यांकडेही निर्देश करतात. पूर्णवेळ परदेशी प्रशिक्षकाचा सततचा अभाव आणि सुनियोजनाची कमतरता यांचे परिणाम आता प्रत्यक्ष मैदानात दिसू लागले आहेत. ज्यामुळे जपानमधील ऐचीनागोया येथे होणाऱ्या खंडस्तरीय क्रीडा महोत्सवात भारताच्या पदकांच्या आशांविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सांघिक प्रकारांमध्ये ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांची मिश्र दुहेरी जोडी हीच आता भारताची एकमेव आशा उरली आहे.

वैयक्तिक तिरंदाजांची आगेकूच

तथापि, वैयक्तिक प्रकारात भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण सर्व भारतीय कंपाऊंड तिरंदाज स्पर्धेच्या 32 जणांच्या फेरीत पोहोचले आहेत. पुरूषांच्या गटात अभिषेक वर्मा, साहील जाधव, कुशल दलाल आणि तेजस देवतळे यांनी आपापले सामने जिंकून पुढील फेरीत प्रवश केला आहे. 32 जणांच्या या फेरीत वर्मा आणि जाधव यांच्यातही एक सामना रंगणार आहे. महिलांच्या गटात 33 वे मानांकन असलेल्या मधुराने चीनच्या वांग युएचा 148-147 अशा अगदी निसटत्या फरकाने पराभव केला. मात्र आता पुढील फेरीत तिला अमेरिकेची अव्वल मानांकीत खेळाडू अॅलेक्सिस रुईझ या कठीण प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार आहे.

पात्रता फेरीत 21 व्या क्रमांकावर राहिल्यामुळे निराशा पदरी पडलेल्या ज्योतीने, कझाकस्तानच्या डायना युनुसोव्हाचा पराभव करत, अचूक 150 गुणांची कमाई करत अत्यंत दिमाखदार पुनरागमन केले. पात्रता फेरीत 13 व्या क्रमांकासह भारताची सर्वोत्तम कामगिरी नोंदवणारी तसेच माजी विश्वविजेती असलेली आदिती हिने ग्रेट ब्रिटनच्या इसाबेल कारपेंटरवर मिळवलेल्या एकतर्फी विजयादरम्यान केवळ तीन गुण गमावले.

Advertisement
Tags :

.