भारतीय तिरंदाजांकडून निराशा
वृत्तसंस्था / अँटाल्या (तुर्की)
येथे सुरू असलेल्या विश्वचषक स्टेज-3 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंनी साफ निराशा केली. या स्पर्धेत कंपाऊंड या प्रकारात भारताच्या एकाही तिरंदाजाला वैयक्तिक गटातील पदक फेरीपर्यंत पोहोचता आले नाही.
शांघायमध्ये यापूर्वी झालेल्या विश्वचषक स्टेज-2 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाजपटूंची कामगिरी समाधानकारक झाली होती. शांघायमधील स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण सात पदकांसह पदक तक्त्यात दुसरे स्थान मिळविले होते. द. कोरियाने आघाडीचे स्थान घेतले होते.
तुर्कीतील स्पर्धेत भारताच्या मधुरा धामणगावकरला महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मेक्सिकोच्या मारियाना बिमेलने मधुराचा 159-152 असा पराभव केला. त्याचप्रमाणे भारताची विश्वविजेती तिरंदाजपटू आदिती स्वामीला मेक्सिकोच्या बिकेराने 152-147 असे पराभूत केले. पुरुषांच्या विभागात भारताच्या 13 व्या मानांकित ऋषभ यादवला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सच्या गेरार्दने 157-149 असे पराभूत केले. अभिषेक वर्माला उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये ऋषभ यादवने पराभूत केले होते. भारताचा विश्वविजेता ओजस देवताळेला पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या लुझकडून हार पत्करावी लागली. तुर्कीमधील सुरू असलेल्या या स्पर्धेत रिकर्व्ह आणि कंपाऊंड सांघिक प्रकारातही भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.