महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निराशा अन् 25 दिवस!

06:43 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्ल्डकप पराभवानंतर रोहितने केले मन मोकळे

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

भारतीय संघ गत महिन्यात 19 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. या पराभवाला जवळपास आता महिना होत आला आहे पण अंतिम सामन्यातील पराभवाच्या वेदना अजूनही सर्वांच्या मनात आहेत. अशात कर्णधार रोहित शर्मा 25 दिवसानंतर प्रथमच समोर आला आहे. रोहितने जवळपास महिन्याभरानंतर या पराभवावर भाष्य केलं आहे. या पराभवातून बाहेर कसं पडायच, हे कळत नव्हतं. फायनलपर्यंत सगळं एकदम मनासारखं होत होतं. मात्र एका दिवसात होत्याचं नव्हतं झालं, असे तो म्हणाला. त्याचा हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने शेअर केला आहे.

वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर रोहित व विराट कोहली हे मैदानात हताश दिसले होते, आणि या दोघांपैकी कोणीही मोठ्या पराभवानंतर विश्वचषक फायनलबद्दल बोलले नव्हते. दोघांनीही स्पर्धेनंतर ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. रोहित तर कुटुंबासह परदेशात सुट्टीसाठी गेला होता. विराटने अद्यापही मौन सोडलेले नाही. यातच कॅप्टन रोहितने समोर येत या पराभवाबद्दल भाष्य केले आहे. अंतिम सामन्यानंतरचे काही दिवस माझ्यासाठी सोपे नव्हते. मला या दु:खातून कसे बाहेर पडावे, याची कल्पना नव्हती, सुरुवातीचे काही दिवस मला काय करावे हे देखील कळत नव्हते. त्यानंतर माझे कुटुंब आणि मित्रांनी माझ्यासाठी चांगले वातावरण तयार केले, मला त्या दु:खावर मात करण्यास मदत केली. खरं सांगायचं झालं तर तो पराभव पचवणं सोपं नव्हतं. आणि त्यासह तुम्हाला पुढे जायचं असतं. हे कठीण होतं आणि पुढे जाणं इतकं सोपं नव्हतं. मी वनडे वर्ल्डकप पाहतच मोठा झालो आहे. आम्ही विश्वचषकासाठी इतकी वर्षं काम केले आहे. पण ठीक आहे, जेव्हा तुम्ही जे स्वप्न पाहता ते तुम्हाला मिळत नाही तेव्हा तुम्ही नक्कीच निराश होता, असे हिटमॅन या मुलाखतीत म्हणाला.

सलग 10 विजय मिळवले पण...

आम्ही सलग दहा सामने जिंकलो, पण यातही आमच्याकडून काही चुका झाल्या. पण जेव्हा तुम्ही मैदानावर खेळता तेव्हा काही चुका या होतातच. कोणीही शंभर टक्के बरोबर नसतं. पण मला माझ्या संघावर गर्व आहे. ज्या पद्धतीने टीम इंडियाने विश्वचषकात कामगिरी केली ती जबरदस्त होती. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्याचा दिवस आमच्यासाठी हा अत्यंत कटू होता. या दिवशी एका दिवसात आम्ही सर्वार्थाने केलेल्या प्रयत्नावर पाणी पडले. आता, या पराभवाला जवळपास महिना होत आला आहे. आयुष्यात पुढे जात राहणे हा गुणधर्म आहे. आता आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेवर फोकस असणार असल्याचे तो म्हणाला.

चाहत्यांनी राग नाही, प्रेम दिले

हिटमॅन पुढे म्हणाला, फायनलनंतर यातून बाहेर कसे पडायचे हे माझ्यासाठी सोपे नव्हते. मी दूर कुठेतरी जायचं ठरवलं, जेणेकरून यातून मी बाहेर पडू शकेन, पण मी कुठेही गेलो तरी त्या आठवणी माझ्या सोबत होत्या. पण आम्हाला दीड महिना इतका पाठिंबा मिळाला त्याबद्दल सर्वांचे आभार. बाहेर असताना जेव्हा मी लोकांना भेटलो, तेव्हा त्यांनी मला समजून घेतले. त्यांच्यात राग नव्हता, पण जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा निखळ प्रेम दिसले. यामुळे मला मोठे बळ मिळाले असून या जोरावर मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे.

आफ्रिका दौऱ्यावर फोकस

ब्रेकनंतर रोहित शर्मा आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. सर्वप्रथम तो भारत अ संघाकडून खेळताना दिसेल. त्यानंतर तो दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. दरम्यान, टी-20 व वनडे मालिकेत त्याचा सहभाग असणार नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका महत्वाची असल्याने रोहित व विराट हे दोघेही या मालिकेत सहभागी होणार आहेत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article