शेतकरी नेत्यांत हमरीतुमरी : मुख्यमंत्र्यांची नाराजी
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत सोमवारी सुवर्ण विधानसौधमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत धक्काबुक्कीची घटनाही घडली. बैठक सुरू होण्याआधी शेतकऱ्यांच्या दोन गटात धक्काबुक्की झाली. या घटनेसंबंधी स्वत: मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बैठक सुरू होण्याआधी सुवर्ण विधानसौधमध्ये शेतकरी संघटनांच्या दोन गटात झालेली वादावादी हातघाईवर आली. शेतकरी संघटनेचे नेते चुन्नाप्पा पुजारी हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंबंधी बैठकीत बोलत असतानाच काही जणांनी त्यांना आक्षेप घेतला. त्यावेळी वादावादीला सुरुवात झाली. पाण्याचे ग्लास फेकण्याचेही प्रकार घडले.
शेतकरी नेते कोडीहळ्ळी चंद्रशेखर व चुन्नाप्पा पुजारी यांच्या समर्थकात सुरू झालेला संघर्ष हातघाईवर येताच पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांचे समाधान केले. सुवर्ण विधानसौधमध्ये घडलेल्या या घटनेची माहिती गुर्लापूर येथील आंदोलनाच्या ठिकाणी समजताच शशिकांत गुरुजी यांनी राजकीय नेत्यांना इशारा दिला.
चुन्नाप्पा पुजारी यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर कोणत्याही आमदार, खासदारांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा शशिकांत गुरुजी यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेसंबंधी नाराजी व्यक्त करीत तुमची हाणामारी टीव्हीच्या माध्यमातून साऱ्यांनी पाहिली आहे. मारहाण करायची असेल तर मला मारहाण करा, आपापसात कशाला मारामारी करता? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. राजकीय नेत्यांमध्ये संघर्ष, युद्ध सुरू असते. तुम्ही शेतकरी आहात. तुमची एकी कायम राहिली पाहिजे, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.
दरम्यान, कारखानदारांची बैठक सुरू असताना काही शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून आंदोलन केल्याचीही घटना घडली. बैठकीसाठी प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला. बैठकीसाठी जागेअभावी केवळ निमंत्रितांना प्रवेश देण्यात आला आहे. तुमचे नेते तुमची बाजू मांडण्यासाठी सुवर्ण विधानसौधमध्ये आहेत, असे सांगत पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी आंदोलनकर्त्यांना महामार्गावरून बाजूला केले. चुक्की नंजुंडस्वामी यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी हस्तक्षेप करीत संघर्ष थांबवला.