दिव्यांग क्रिकेटपटूचे धावत्या रेल्वेत निधन
वृत्तसंस्था/ मथुरा
छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. पंजाबमधील 38 वर्षीय दिव्यांग क्रिकेटपटू विक्रम सिंग यांचा व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धेसाठी दिल्लीहून ग्वाल्हेरला प्रवास करताना मृत्यू झाला आहे. प्रवासादरम्यान सिंग यांची प्रकृती अचानक बिघडली आणि अनेक आपत्कालीन कॉल करूनही वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचू शकली नाही.
मदत मिळवण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. पण मथुरा स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. बुधवारी रात्री हजरत निजामुद्दीन स्टेशनवरून छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये संघ चढला होता. रेल्वे सुटण्याच्या क्षणाला लगेचच सिंग यांना तीव्र वेदना होऊ लागल्या आणि ट्रेन मथुराजवळ येताच त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली. पहाटे 4:58 वाजता रेल्वे हेल्पलाइनवर आपत्कालीन कॉल करण्यात आला आणि तातडीने वैद्यकीय मदतीची विनंती करण्यात आली. यावेळी रेल्वे विभागकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही. ट्रेन सुमारे 90 मिनिटे उशिराने आली आणि अखेर सकाळी 8:10 वाजता मथुरा स्टेशनवर पोहोचली तोपर्यंत सिंग यांचा मृत्यू झाला होता. मथुरा जंक्शनवर, सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) अधिकाऱ्याने सिंग यांचा मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनाची व्यवस्था केली. जीआरपीने औपचारिक कार्यवाही सुरू केली आहे, तर रेल्वे अधिकाऱ्यांनी उशिरा प्रतिसादाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.