दिव्यांग बांधवांनी महसूल प्रशासनाला विचारला जाब
शासकीय योजनांचा लाभ देण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार
ओटवणे प्रतिनिधी
तहसील कार्यालयातून दिव्यांगाना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यास दिरंगाई होत असल्याबद्दल तसेच कार्यालयात येण्यासाठी दिव्यांगाना व्हील चेअर नसल्याची तक्रार करीत संतप्त दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय देसाई यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसिलदार श्री मुसळे यांना जाब विचारला. तसेच दिव्यांगांच्या विविध समस्यांचा त्यांच्यासमोर पाढाच वाचला.
यावेळी नायब तहसिलदार श्री मुसळे यांनी आपण स्वखर्चाने कार्यालयामध्ये व्हील चेअर आणून ठेवणार असल्याची ग्वाही दिली. तसेच यापुढे कोणत्याही दिव्यांग बांधवांना कर्मचारी वर्गाकडून कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासन देऊन दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल आणि अंत्योदय रेशन कार्ड संदर्भात लवकरच इष्टांकाप्रमाणे दिव्यांग बांधवाना योजनेचा लाभ दिला जाईल असे सांगितले.
यावेळी दोडामार्ग साई कृपा दिव्यांग गरजू निराधार संघटना अध्यक्ष साबाजी सावंत, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष स्वप्नील लातये, सिंधुदुर्ग दिव्यांग सेनेचे जिल्हा सचिव अमित गोडकर, कोलगाव अध्यक्ष सौ. घोगळे, प्रवीण राऊळ, चंद्रकांत परब, रुजाय गोम्स, शिल्पा जाधव, सौ. बहादूर, दीपक राऊळ, सचिन परब, भगवान राणे, हेमंत राऊळ आदी दिव्यांग बांधव आणि त्यांचे पालक उपस्थित होते.