थेटपाईपलाईनचे क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण; उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा; 26 ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
कोल्हापूर : थेटपाईपलाईन पाणीपुरवठा होण्यासाठी कसबा बावडा पाईपलाईनवर क्रॉस कनेक्शनचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
कोल्हापूर प्रतिनिधी
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील दुसरा पंप सुरू झाला आहे. शहरातील उर्वरीत भागात थेटपाईपलाईनने पाणी देण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून क्रॉस कनेक्शनची कामे हाती घेतली आहेत. शनिवारी (दि.2) कसबा बावडा येथील क्रॉस कनेक्शनचे सुरू झालेले काम रविवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. दरम्यान, या कामामुळे सलग दुसऱ्या दिवशी ई वॉर्डसह शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहिल्याने 26 ठिकाणी मनपाने टँकरने पाणीपुरवठा केला.
कसबा बावडाकडे जाणाऱ्या पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाले असले तरी आज, सोमवारीही अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. उद्या सोमवारीच पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली आहे. तसेच पुईखडी येथील क्रॉस कनेकश्नचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. यानंतर दोन पंप सुरू केले जातील. स्काडा यंत्रणा सेटींग करण्यात येईल. या कामासाठी आणखीन काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात शहरातील इतर भागात थेटपाईपलाईनचे पाणी येईल, असा दावाही सरनोबत यांनी केला आहे.
पुढील टप्प्यात थेटपाईपलाईनचे पाणी येणारा परिसर
संपूर्ण ई वॉर्ड, कावळा नाका, नागाळा पार्क, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, विचारे माळ, संपूर्ण कसबा बावडा, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर.