आपल्याच गावातील मुलांना नोकरी देण्याकडे संचालकांचे दुर्लक्ष
खानापुरात बँक विकास पॅनेलची पत्रकार परिषद
वार्ताहर/नंदगड
खानापूर को-ऑप. बँकेत नोकर भरती करताना 13 संचालकांनी आपल्या गावातील किंवा शहरातील एकेक युवकाला जरी या बँकेत रोजगाराची संधी दिली असती तर या भागातील भागधारक धन्य झाले असते. परंतु विद्यमान संचालक मंडळाने सर्व नियम धाब्यावर बसवून सभासदांचे हित न पाहता नोकर भरती केली आहे. अन्यायी नोकर भरतीसंदर्भात सर्वत्र चर्चा होत असताना गेल्या सहा महिन्यांपासून पत्रकार परिषद घेऊन खुलासा का केला नाही, नोकर भरतीत 90 टक्के मार्क मिळालेल्यांना डावलण्यात आले आहे. त्यातच निवड झालेल्यांनासुद्धा अद्याप रितसर नियुक्ती पत्रे देण्यात आली नाहीत. बँकेकडे कॉल
डिपॉझिट ठेवा म्हणून तालुक्यातील विविध सोसायट्यांच्या कार्यालयांचे उंबरठे का झिजवावे लागत आहेत? असा प्रतिप्रश्न बाळाराम शेलार यांनी यावेळी केला. राजेंद्र चित्रगार यांनी एकाच घरात अनेकांना कर्ज देणे आरबीआयच्या कोणत्या नियमात बसते? असा प्रश्नही केला आहे. गोविंदराव डिगेकर म्हणाले, प्रत्येकवर्षी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी भरायची असते. परंतु यावर्षी ग्रॅच्युटी न भरता बँकेचा नफा दाखवण्यासाठी निधी ठेवला असल्याचे सांगितले. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. बँकेच्या फर्निचरसाठी करण्यात आलेला खर्च संशयास्पद असल्याचे वक्तव्य शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी उमेदवार संतोष हंजी, मारुती खानापुरी, गंगाराम गुरव, शांताराम निकलकर, सीताराम बेडरे, रंजना पाटील, कृष्णा कुंभार, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. विकास पॅनेलच्या सर्वच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही करण्यात आले.