पाटणा एम्सच्या संचालकांना पदावरून हटविले
मुलाचे खोटे प्रमाणपत्र तयार करविल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील पाटणा एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. गोपाल कृष्ण पाल यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने गोपाल कृष्ण पाल यांना एम्सच्या कार्यकारी संचालक पदावरून हटविले आहे. एम्स गोरखपूरचा अतिरिक्त प्रभार असताना पाल यांनी स्वत:च्या मुलाचे नामांकन पीजीमध्ये करविले होते. याकरता त्यांनी स्वत:च्या पुत्राचे प्रमाणपत्र नॉन क्रीमि लेयर अंतर्गत तयार करविले होते असा आरोप आहे.
आरोग्य मंत्रालयाने एम्स देवघरचे कार्यकारी संचालक डॉक्टर सौरभ वार्ष्णेय यांना 3 महिन्यांसाठी किंवा नव्या संचालकाची नियुक्ती होईपर्यंत एम्स पाटण्याच्या संचालकपदी नियुक्त केले आहे. तर पाल यांच्यावर ही कारवाई दोन सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानंतर केली आहे.
चौकशी समितीने डॉ. गोपाल कृष्ण यांना स्वत:च्या पद आणि अधिकारांचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. पाल यांचा पुत्र डॉ. ऑरो प्रकाश पालने गोरखपूर एम्सच्या मायक्रोबायोलॉजीमध्ये प्रवेश घेतला होता. हा प्रवेश ओबीसी श्रेणी अंतर्गत झाला होता. पाटण्यातून एक नॉन क्रीमिलेयरचे प्रमाणपत्र जारी झाले होते, ज्याच्या आधारावर हा प्रवेश मिळाला होता. काही काळानंतर या प्रमाणपत्रावर प्रश्न उपस्थित झाले होते.