For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

...तर संचालकपदाची पुढील निवडणूक लढविण्यास अपात्र! शिक्षक बँकेच्या माजी संचालकांना जिल्हा उपनिबंधकांची नोटीस

08:11 PM Apr 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
   तर संचालकपदाची पुढील निवडणूक लढविण्यास अपात्र  शिक्षक बँकेच्या माजी संचालकांना जिल्हा उपनिबंधकांची नोटीस
Advertisement

नियम डावलून कर्मचारी भरती केल्याचा ठपका, नोटीसवर 22 एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत म्हणणे मांडण्याची संधी, सबळ पुराव्यासह मांडावे लागणार म्हणणे

कृष्णात चौगले कोल्हापूर

दि प्राथमिक शिक्षक बँकेच्या 2014 ते 2020 या कालावधीतील तत्कालिन संचालक मंडळाने ज्या संस्थेमार्फत बँकेमध्ये नोकरभरती केली आहे, ती संस्था, मान्यता प्राप्त नाही. त्यामुळे नियमबाह्य संस्थेमार्फत कर्मचारी भरती केल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बँकेच्या पोटनियमांचे उल्लंघन करुन संचालकांच्या नातेवाईकांची कर्मचारी म्हणून भरती केली आहे. परिणामी सहकारी संस्थेचे संचालक म्हणून कामकाज करताना शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन केले नसल्याने तत्कालिन संचालक मंडळ दोषी ठरत आहे. त्यामुळे शिक्षक बँकेच्या संचालक पदासाठी यापुढील संचालक मंडळाचा एक कार्यकाल संपेपर्यंतच्या कालावधीसाठी पुन्हा नियुक्त अथवा नामनिर्देशित करण्यास तसेच पुन्हा निवडून येण्यास अपात्र घोषित का करू नये ? असे नोटीस जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी सर्व माजी संचालकांना लागू केले आहे. याबाबत 22 एप्रिल सुनावणीसाठी समक्ष हजर राहून सबळ कागदोपत्री पुराव्यासह तोंडी म्हणणे मांडण्याबाबत करे यांनी संचालकांना सूचित केले आहे.

Advertisement

प्राथमिक शिक्षक सहकारी बँक महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 अन्वये नोंदविण्यात आलेली सहकारी बँक आहे. सदर बँकेस बँकिंग व्यवहार करण्याचा परवाना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून, मिळालेला आहे. या बँकेचे कामकाज, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961, बँकेचे मंजूर उपविधी, महाराष्ट्र शासनाचे ध्येय धोरण आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांचेकडील मार्गदर्शक सुचनेनुसार करणे बँकेच्या व्यवस्थापनास बंधनकारक आहे. या बँकेच्या सन 2014-2015 ते 2019-2020 या कालावधीतील संचालक मंडळाने बँकेमध्ये माहे मे, 2019 मध्ये नोकरभरती केलेली आहे. राज्यातील नागरी सहकारी बँकांना नोकरभरती प्रक्रिया ऑनलाईन राबविण्याबाबत सर्व नागरी सहकारी बँकांना निर्देश दिलेले आहेत. पण आपण आपल्या बँकेमध्ये नोकरभरती करताना, सदर निर्देशांचे व त्यातील कार्यपध्दतीचे पालन केलेले नसल्याचे निदर्शनास आले असल्याचे जिल्हा उपनिबंधक करे यांनी तत्कालिन संचालकांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद आहे.

पन्हाळा शाखेतील त्या 10 कर्मचाऱ्यांची भरती नडणार ?
2019 मध्ये तत्कालिन संचालक मंडळाने पन्हाळा शाखा असल्याचे दाखवून 10 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. ही भरती देखील नियम डावलून केल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे तत्कालिन संचालक मंडळाकडून या भरतीबाबत कोणते म्हणणे दिले जाते, ते सहकार विभागातील कायद्याच्या चौकटीत बसणार काय ? की ही भरती तत्कालिन संचालकांना नडणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल.

Advertisement

तर पुढील एक कार्यकाल संपेपर्यत संचालक म्हणून जाण्यास अपात्र
नोटीसवर मुदतीत लेखी खुलासा सादर न केल्यास अथवा दिलेल्या सुनावणी तारखेस म्हणणे न मांडल्यास तसेच केलेला खुलासा कायदेशीर व समाधानकारक नसल्यास प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या यापुढील समितीचा एक कार्यकाल संपेपर्यंतच्या कालावधीसाठी संचालक म्हणून पुन्हा नियुक्त करण्यास अपात्र घोषित केले जाईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक करे यांनी दिला आहे.

बेकायदेशीर नोकरभरतीबाबत कारवाई सुरु
दि प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये नोकर भरती करताना शासन निर्णयाचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या बेकायदेशीर भरती प्रक्रियेबाबत पुढील कारवाई करण्याबाबत शिक्षक बँक प्रशासनाला कळवले आहे. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल. ही भरती प्रक्रिया 2019 साली तत्कालिन संचालक मंडळाच्या काळात झाली होती. सध्या ते संचालक मंडळ अस्तित्वात नाही. त्यामुळे सहकार कायद्यानुसार त्यांना नोटीस लागू केली असून त्यांना पुराव्यासह म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
निलकंठ करे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था

Advertisement
Tags :

.