थेट मैदानातून
अहमदाबाद.:
रात्र वैऱ्याची आहे.. जागे रहा.!
हे वाक्य भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या कानात घुमत राहणे जरुरीचे झाले आहे. अहमदाबाद येथील पहिल्या सुपर 8 सामन्यात गतविजेत्या भारतीय संघास दारुण पराभव पत्करावा लागला आणि लाखो रसिकांची घोर निराशा झाली.
एका शब्दात या अपयशाचे विश्लेषण करता येईल. ते म्हणजे ‘बेजबाबदार’ खेळ...!
माझ्यामते ज्या क्षणी दक्षिण आफ्रिकेने 187 धावसंख्या गाठली, तिथेच सामना भारताच्या हातातून निसटला.
वास्तविक आफ्रिकेची सुरुवात खराब झाली होती. 3 बाद 20 नंतर आफ्रिकेच्या फलंदाजांनी हाराकिरी न करता सावध आणि परिपक्व खेळाचे दर्शन घडविले. खेळपट्टीवर भक्कम उभे राहिले की धावा येतच राहतात, हे ब्रेवीस आणि स्टब्स यांनी दाखवून दिले. डेव्हिड मिलरने तर कमाल केली. सामना जिंकण्यासाठी परिस्थिती ओळखून कसे खेळावे याचे उदाहरण म्हणजे मिलरची बचाव आणि आक्रमणाची लाजवाब खेळी. 3 षटकार आणि 7 चौकार ठोकून त्याने भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरविली. बुमराह आणि अर्शदीप यांनी खेळपट्टी जोखून टिच्चून गोलंदाजी केली. आणि संघाला सुरुवातीस यशही मिळवून दिले. परंतु फिरकी गोलंदाजांची सपशेल धुलाई झाली.
आफ्रिकेने शेवटच्या 4 षटकात 40 हून अधिक धावा लुटल्या आणि इथेच सामना स्वत:कडे झुकवला. वरुण 4 षटकात 47 धावा बहाल. होर्दिक पांड्या 4 षटके 45 धावा, दुबे 2 षटकांत 32 ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.
दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 188 चे लक्ष्य हे सोपे काम नव्हते. प्रकाशझोतात खेळताना ते अधिकच कठीण होऊन बसते, याचे भान भारतीय फलंदाजांना राहिले नव्हते असे दिसून आले. प्रथम खेळपट्टीवर पाय रोवून घ्यायचे नंतर परिस्थितीनुसार फटकेबाजी करायची.. असे घडले नाही.
सर्व फलंदाजांनी उतावीळपणे खेळ केला. शिवम दुबे वगळता भारतीय फलंदाजीचे वर्णन अक्षम्य बेजबाबदारपणा असेच करावे लागेल. खेळपट्टीवर चेंडू हळू आणि थांबून येत असताना त्यांनी उंच फटके मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे ते मिडऑफ, मिडऑन, मिडविकेट. लॉंगऑन, लॉन्गऑफ येथे झेल देऊन परतले.
प्रशिक्षक आणि संघव्यवस्थापन यांनी त्वरित योग्य पावले उचलून सुधारणा घडविणे अनिवार्य आहे. स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवायचे असेल तर आता पुढील सामने जिंकावे तर लागतीलच शिवाय मोठ्या फरकाने विजय साकारावे लागतील. म्हणजे रनरेट वगैरे गुंतागुंतीतून सुटका मिळेल. एका पराभवाने खचून जाण्याचे कारण नाही. शेवटी हा खेळ आहे.. त्यातून टी 20 सामना म्हणजे अप्रत्याशीत..!
भारतीय खेळाडू पुढील सामन्यात चमकदार कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे.
‘जो भीतर से विजेता होता है, हार उन्हें ही प्रेरित करती है..।
जो भीतर से पराजित होते है, वह हारने के बाद हिम्मत छोड़ देते हैं’ ।।