दिशाहिन अर्थसंकल्प : अमित पाटकर यांची प्रतिक्रिया
पणजी : गोव्यासारख्या छोट्या राज्याकडे या अर्थसंकल्पातून पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, अशी टीका गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. तो पूर्णपणे दिशाहिन असून सामान्य जनतेसाठी त्यात काहीच नाही. बेकारी निर्मूलन व नोकऱ्यांची वाढ यासाठी अर्थसंकल्पातून काहीच साध्य होणार नसल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, वाढती महागाई रोखण्यासाठी आणि त्यातून जनतेला दिलासा मिळावा म्हणून त्यात कोणताही प्रयत्न दिसत नाही. ग्रामीण भाग,शेतकरी वर्गासाठी कोणतीही तजवीज नसल्याचे पाटकर यांनी नमूद केले.
गोव्यासाठी कोणतीही विशेष तरतूद नाही. बेकारी कमी व्हावी म्हणून कोणत्याही योजना अर्थसंकल्पात नसल्याचे पाटकर यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प जनता विरोधी तसेच गोवा विरोधी असल्याचे सांगून ते म्हणाले की, शेतकरीवर्ग व लघू उद्योगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. गोमंतकीय जनतेला विचारात व विश्वासात न घेता नको असलेले प्रकल्प लादले जात असून सदर अर्थसंकल्पाचा पाटकर यांनी निषेध केला आहे. गोव्यातील पर्यटन वाढीसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. खाणग्रस्त जनतेवर त्यातून अन्याय करण्यात आल्याचे पाटकर यांनी नमूद केले. डबल इंजिन सरकार असलेल्या भाजपचे हे अपयश अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसते, असेही पाटकर म्हणाले.