For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक प्रचाराची दिशा आणि दशा

06:45 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक प्रचाराची दिशा आणि दशा
Advertisement

भारतीय जनता पक्षाची प्रभावी प्रचारशैली...

Advertisement

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रथम टप्पा आता पार पडला आहे. अद्याप सहा टप्पे व्हायचे आहेत. यावेळी एकंदर प्रचाराचे स्वरुप आणि त्याची दिशा कशी आहे, याचा आढावा घेणे आवश्यक ठरणार आहे. ही निवडणूक प्रदीर्घ काळ चालणार असल्याने सर्व राजकीय पक्ष झालेल्या मतदानाचा आढावा घेऊन पुढच्या टप्प्यांसाठी प्रचाराचे नियोजन करु शकणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यानंतर प्रचाराचे स्वरुप भिन्न होऊ शकते. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि त्याची राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरुद्ध विरोधकांची आघाडी अशी प्रमुखत: असली, तरी जे पक्ष या दोन्ही आघाड्यांमध्ये नाहीत, त्यांची भूमिकाही महत्वाची आहे. त्यामुळे, सत्ताधारी आघाडी, विरोधी आघाडी आणि अन्य पक्ष यांनी प्रचाराची आखणी कशी केली आहे, हे माहीत करुन देण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक आघाडीची काही बलस्थाने आणि काही दुर्बलताही आहे. तसेच स्वत:च्या विचारसरणीनुसार या आघाड्यांनी प्रचाराचा रोख ठेवल्याचेही स्पष्ट होत आहे. प्रचारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वच पक्षांकडून केला जात असून त्यावरही एक दृष्टीक्षेप टाकला जाणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान, विशेषत: संपर्क साधनांचा उपयोग गेल्या चार निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर होत असला, तरी या निवडणुकीत ‘कृत्रिम बुद्धीमत्ते“वर आधारलेली साधने उपयोगात आणली जाताना दिसतात. त्यामुळे या सदरासह पुढील काही भागांमध्ये प्रचार पद्धती आणि साधने यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आजच्या सदरात भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या प्रचारशैली आणि प्रचारसंकल्पांवर दृष्टीक्षेप टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

? पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भारतीय जनता पक्षाचे आणि सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख प्रचारक अर्थातच आहेत. त्यांनी निवडणुकीची घोषणा होण्याच्या तीन ते चार महिने आधीपासूनच वातावरण निर्मिती करण्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. देशाच्या दक्षिण, उत्तर, पूर्व आणि पश्चिम अशा चारही भागांमध्ये जास्तीत जास्त संचार करुन प्रकट सभांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क करणे ही प्रचारपद्धती त्यांनी 2014 पासून आचरणात आणलेली आहे. तिचाच उपयोग या निवडणुकीतही करण्यात येत आहे, असे दिसून येते. एका दिवशी ते तीन ते चार सभांना संबोधित करीत आहेत. तसेच एका दिवशी दोन ते तीन राज्यांमध्ये त्यांचा संचार चालत आहे. यावेळी दक्षिणेतील राज्यांवर त्यांचा विषेश भर आहे.

Advertisement

? त्यांच्या खालोखाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचारासाठी देशभर फिरताना दिसतात. जाहीर सभा आणि रोड शोवर त्यांचा भर आहे. प्रचाराप्रमाणेच त्यांच्यावर प्रचाराचे धोरण ठरविण्याचेही उत्तरदायित्व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांच्यासह आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवार ठरविणे, मित्रपक्षांशी जागावाटपासंदर्भात चर्चा करणे, काही मतभेद निर्माण झाल्यास ते दूर करणे आदी महत्वाची कामे त्यांच्यावर प्रामुख्याने सोपविलेली आहेत. निवडणूक बराच काळ चालणार असल्याने उमेदवार निश्चितीही त्वरित होणार नाही. तरीही भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 450 हून अधिक उमेदवारांची नावे घोषित केलेली आहेत. ऊर्वरित जागा मित्रपक्षांना सोडल्या जाण्याची शक्यता आहे.

? भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश न•ा यांच्याकडे प्रामुख्याने धोरण निर्धारित करण्याचे उत्तरदायित्व आहे. ते फारशा जाहीर सभा घेताना दिसत नाहीत. पण प्रत्येक उमेदवाराच्या प्रचारकार्यावर लक्ष ठेवणे, प्रत्येक मतदारसंघातील परिस्थितीची माहिती घेणे, उमेदवार आणि स्थानिक प्रचारकांना मार्गदर्शन करणे, मित्रपक्षांशी चर्चा करणे, कोठे कमतरता असल्याचे जाणवल्यास त्वरित कृती करुन ती दूर करणे या कामांमध्ये त्यांनी स्वत:ला गुंतवले असल्याचे दिसून येते. अर्थात, त्यांच्या साहाय्यासाठी पक्षाने अनेक सहाय्यकांचा एक कक्ष स्थापन केला असून हे ‘बॅक रुम बॉईज’ त्यांना आवश्यक ते सर्व साहाय्य तत्परतेने करत असतात.

? भारतीय जनता पक्षाचा निवडणूक कक्ष हा सदैव कार्यमग्न असतो, असे म्हटले जाते. एक निवडणूक झाली, की त्वरित पुढच्या निवडणुकीच्या सज्जतेला प्रारंभ केला जातो, हे या पक्षाचे वैशिष्ट्या असल्याचे सांगण्यात येते. भारतीय जनता पक्ष स्पर्धेत असणाऱ्या सर्व मतदारसंघाच्या प्रत्येक मतदानकेंद्रात पक्षाची स्थिती अशी आहे ?, ती आणखी सुधारण्यासाठी काय करता येईल ?, प्रत्येक मतदानकेंद्राच्या कक्षेतील कार्यकर्ते किती प्रमाणात क्रियाशील आहेत ?, कोठे स्थिती भक्कम आहे आणि कोठे ती कमजोर आहे ?, याची सर्व माहिती या निवडणूक कक्षाला असते, असेही जाणकारांचे मत आहे. या कक्षात अनेक कार्यकर्ते, तज्ञ, मतसर्वेक्षणतज्ञ किंवा सेफॉलॉजिस्टस् अहोरात्र कार्यरत असतात.

‘पन्नाप्रमुख’ हे वैशिष्ट्या

? भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचाराला व्यवस्थापकीय आणि व्यावसायिक स्वरुप दिले आहे. अन्य कोणत्याही पक्षाकडे इतकी शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा नाही. सर्वोच्च नेत्यापासून मतदान केंद्राच्या पातळीवरच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ आणि समन्वय या पक्षात जितका दिसतो, तितका तो अन्य पक्षात नसल्याचे, या पक्षाचे विरोधक असणारे राजकीय तज्ञही मान्य करतात. प्रचारकार्यात या पक्षाने काही नव्या आणि अनोख्या संकल्पना आणल्या आहेत. ‘पन्नाप्रमुख“ ही त्यातील एक.

? प्रत्येक मतदान केंद्रावर त्या केंद्राच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मतदारांची सूची असते. सर्वसाधारणपणे एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदार सरासरी असतात. मतदारसूचीच्या एका पृष्ठावर साधरणत: 25 मतदारांची नावे, छायाचित्रे आणि इतर माहिती असते. अशा प्रकारे एका मतदानकेंद्रावरील मतदार सूचीत 40 पाने असतात, असे गृहित धरले जाते. या प्रत्येक पृष्ठाचे उत्तरदायित्व एका कार्यकर्त्याकडे दिले जाते. त्याला ‘पन्नाप्रमुख“ असे म्हणण्याची पद्धत आहे.

? पन्नाप्रमुखाने त्याला दिलेल्या पानावरच्या मतदारांशी संपर्क करायचा असतो. हे मतदार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर येतील आणि मतदान करतील, हे पाहण्याचे उत्तरदायित्व त्याचे असते. केवळ मतदानाच्या दिवशीच नव्हे, तर एरवीही त्याने त्याच्या पानावरील मतदारांच्या संपर्कात राहून त्यांना पक्षाशी जोडलेले ठेवावे, अशी त्याच्याकडून अपेक्षा असते. यामुळे पक्ष आणि मतदार यांच्यात एक भावनिक आणि निष्ठेचे नाते निर्माण होते. पन्नाप्रमुख हा म्हणूनच महत्वाचा ठरतो.

? अर्थातच, सर्व मतदारसंघांमधील सर्व मतदानकेंद्रांवर असे पन्नाप्रमुख असतीलच असे नाही. पण पुष्कळ प्रमाणात ही संकल्पना भारतीय जनता पक्षाने यशस्वी करुन दाखविली असल्याचे तज्ञांचे मत आहे. ही संकल्पना नेमकी कोणाला सुचली हे घोषित करण्यात आले नसले, तरी ती अमित शहा यांची आहे, असे बोलले जाते. अशी संकल्पना, आणि तिचे इतके काटेकोर क्रियान्वयन अन्य पक्षांना जमलेले नाही, असे दिसते. कारण लक्षावधी निष्ठावान कार्यकर्ते लागतात.

Advertisement
Tags :

.