For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला थेट संदेश

06:58 AM Jul 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला थेट संदेश
Advertisement

दहशतवादाच्या समर्थकांना सोडणार नाही : कारगील विजय दिनी लष्करप्रमुखांचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, द्रास

कारगील विजय दिनानिमित्त भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करत पुन्हा एकदा पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर बोलताना दहशतवादाच्या समर्थकांना हा स्पष्ट संदेश असल्याचे सांगितले. आता भारत केवळ शोक करत नाही तर निर्णायक प्रत्युत्तर देतो. हे देशाचे नवीन धोरण आहे. भविष्यातही दहशतवादाच्या समर्थकांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा लष्करप्रमुख द्विवेदी यांनी दिला.

Advertisement

द्रास येथील कारगील युद्ध स्मारकात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात लष्करप्रमुख जनरल द्विवेदी यांनी उपस्थिती दर्शवली. याप्रसंगी बोलताना त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर होते असे सांगताना दहशतवादाला पाठिशी घातले जाणार नाही’ असेही स्पष्ट केले. आज संपूर्ण देश कारगील विजय दिन साजरा करत आहे. या दिवशी भारताच्या योद्ध्यांनी युद्धभूमीवर पाकिस्तानी आक्रमकांना पराभूत केले होते. हा दिवस भारत कधीही विसरू शकणार नाही. त्याच पद्धतीने अलिकडेच पाकिस्तानविरोधात करण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणीही विसरल्या जाऊ शकत नाहीत, असे लष्करप्रमुख म्हणाले.

कारगील विजय दिनानिमित्त शूर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेल्या लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पहलगाम हल्ल्यापासून ऑपरेशन सिंदूरपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य केले. त्यांनी कारगील युद्धाची आठवण करून देत पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा दिला. तसेच ऑपरेशन सिंदूर सुरू करून भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे असे सांगताना दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आता सोडले जाणार नाही, असेही स्पष्टपणे नमूद केले.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख

केंद्र सरकारने दिलेल्या मोकळिकीमुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे भारतीय सुरक्षा दलाने शत्रूला योग्य उत्तर दिले. भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणाऱ्या किंवा नागरिकांना हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही शक्तीला आता योग्य उत्तर दिले जाईल. ही भारताची नवीन पद्धत आहे, असे जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानमध्ये नऊ उच्च-मूल्यवान दहशतवादी लक्ष्ये नष्ट करण्यात आली. ही कारवाई पूर्णपणे अचूक होती. या ऑपरेशनद्वारे भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करत त्यांचे धाडस हाणून पाडून निर्णायक विजय मिळवला, असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

संरक्षणमंत्र्यांकडूनही हुतात्म्यांना अभिवादन

कारगील विजय दिनाला 26 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शनिवारी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकात पोहोचले. त्यांच्यासोबत तिन्ही सेना प्रमुखही उपस्थित होते. राजनाथ यांनी हुतात्मा सैनिकांना अभिवादन केले. कठीण परिस्थितीतही देशाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी असाधारण धैर्य, संयम आणि दृढ निश्चय दाखवणाऱ्या वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. कारगील युद्धादरम्यान त्यांचे सर्वोच्च बलिदान आपल्या सशस्त्र दलांच्या अटल दृढ निश्चयाची चिरंतन आठवण करून देते. भारत त्यांच्या सेवेचा नेहमीच ऋणी राहील, असे संरक्षणमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून हुतात्म्यांना आदरांजली

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही कारगील युद्धातील हुतात्म्यांना आदरांजली शब्द सुमनांजली वाहिली. ‘कारगील विजय दिवस हा प्रसंग देशाच्या अभिमानाचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या अतुलनीय धैर्य आणि शौर्याची आठवण करून देतो, असे ट्विट पंतप्रधानांनी केले. तर कारगील विजय दिनानिमित्त मी आपल्या मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करते. हा दिवस आपल्या सैनिकांच्या असाधारण शौर्य, धैर्य आणि अटल दृढ निश्चयाचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपतींनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे.

कारगील विजय दिनाची महती

1999 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आठवणीनिमित्त दरवर्षी 26 जुलै रोजी कारगील विजय दिन साजरा केला जातो. 5 मे 1999 रोजी पाकिस्तानने घुसखोरी केल्यानंतर कारगीलच्या पर्वत शिखरांवर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झाले. हे युद्ध सुमारे 84 दिवस चालले. 26 जुलै 1999 रोजी भारताच्या विजयाने अधिकृतपणे युद्ध संपले. भारतीय सैनिकांच्या बलिदानाचे आणि शौर्याचे स्मरण करून दरवर्षी 26 जुलै रोजी कारगील विजय दिन साजरा केला जातो.

Advertisement
Tags :

.