जिल्हाधिकारी, प्रांत, तहसील कार्यालयात आता थेट प्रवेश !
सांगली :
महसूल विभाग म्हणजे अडवणूक आणि पिळवणूक अशी प्रतिमा सर्वसामान्यामध्ये आहे. ‘अण्णासाहेबांनी’ केलेल्या अन्यायाची कैफियत मांडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट दूरच पण प्रांत, तहसिलदारांच्या भेटीसाठीही हेलपाटे आणि तासनतास प्रतीक्षा करावी लागे. काही वर्षात सांगली महसुलच्या या कारभाराला वैतागलेल्या सर्वसामान्यांना नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सुखद धक्का दिला. आपल्यासह प्रांत, तहसिलदार कार्यालयात आठवडयातून दोन दिवस चिठ्ठीशिवाय थेट जनतेला प्रवेश देण्यास सुरूवात केली आहे.
सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणींचा जागेवर निपटारा करण्यात येणार आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी यायचे झाल्यास दिवस काढावा लागणार हा आजपर्यंतचा सर्वसामान्यांचा अनुभव. तासनतास थांबूनही जिल्हाधिकारी भेटतील याची गॅरंटी नसायची. पण शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याची वेळ. जिल्हाधिकारी काकडे यांच्या दालनाबाहेर दोन शिपाई बसलेले. जिल्हाधिकाऱ्यांकडे येणाऱ्या नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांच दालनात प्रवेश देण्यात येत होता. चिठ्ठी नाही, कोणाला काय काम आहे अशी विचारणा नाही. थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नागरिकांना प्रवेश देण्यात येत होता. जिल्हाधिकारी प्रत्येकाची चौकशी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावत होते. शक्य असेल त्यांना जागेवर बोलावून कामाबद्दल चौकशी आणि कामाच्या प्रगतीबद्दल विचारणा करत होते. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह काही प्रमुख अधिकारीही दालनात उपस्थित होते.
- ‘झेड’ शेऱ्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
तलाठी, सर्कल यांनी दिलेल्या त्रासापासून महसुलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दलच्या तक्रारी जिल्हाधिकारी ऐकून घेत होते. पोलीस, सार्वजनिक बांधकाम, समाजकल्याण, सहकार, अशा विविध विभागांच्या तक्रारी येत होत्या. आवश्यक त्या तक्रारी अर्जावर ‘झेड’ शेरा मारून त्याला कालमर्यादा घालून देत होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या सुखद धक्क्याने महसुलच्या बदलत्या कारभाराची झलक सांगलीकरांना पहायला मिळाली.
- यापुढे दर सोमवार आणि शुक्रवारी जनतेशी थेट संवाद : जिल्हाधिकारी काकडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच अधिकाऱ्यांना आठवडयातून दोन दिवस थेट जनतेशी संवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. महसूल प्रशासन हा शासनाचा आरसा असतो. प्रशासन जनतेची कशी कामे करते यावरूनच शानाची प्रतिमा जनतेच्या मनात तयार होते. त्यामुळे यापुढे आपल्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांत आणि तहसिल कार्यालयात प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत थेट प्रवेश मिळेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी ‘तरूण भारत संवाद’शी बोलताना दिली. नागरिकांनी आपल्या अडचणी असतील तर या दिवशी थेट यावे. आपल्यासह अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी चिठ्ठी देण्याची अथवा प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.