एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मालवणातून थेट बससेवा
विद्यार्थी - विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी उपक्रम ; संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते शुभारंभ
मालवण । प्रतिनिधी
विद्यार्थी - विद्यार्थिनींची शैक्षणिक गैरसोय टाळून त्यांना सुलभ प्रवास करता यावा या उद्देशाने सुकळवाड - ओरोस येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने मालवण मधून थेट बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बस सेवेचा शुभारंभ सोमवारी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.ओरोस रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मालवणसह जिल्ह्यातील मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेतात. याठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाच्या निकषप्रमाणे शैक्षणिक शुल्कात सवलत दिली जात असून विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जात आहे. येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना एसटी प्रवासात होणारी अडचण लक्षात घेऊन कॉलेजच्या वतीने थेट मालवण ते कॉलेज पर्यंत बस सेवा सुरु करण्यात आली आहे. याचा शुभारंभ सोमवारी संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, राकेश सावंत, अशोक सावंत, अक्षय परुळेकर, अपर्णा मांजरेकर, रोशनी वरक, अनिरुद्ध झांटये, भिकाजी जाधव, सुनील शिवगण, गितेश राणे, निखिल तेंडोलकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील अन्य भागातून देखील विद्यार्थ्यांसाठी आवश्यकता भासल्यास अशा प्रकारे बस सेवा सुरु करणार असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष विनोद कदम यांनी दिली आहे.