For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायकल राईडची पॅशन जपणारा-गोव्याचा दिप्तेश कुर्टीकर

06:00 AM Feb 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
सायकल राईडची पॅशन जपणारा गोव्याचा दिप्तेश कुर्टीकर
Advertisement

टूर दी 100-विश्व सायक्लींग स्पर्धेत गोव्यातून प्रथम : 546 राईडमधून एकूण 30,215 कि. मी. अंतर पार

Advertisement

सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. सायकल भ्रमण करताना  निसर्गाच्या सानिध्यात मिसळण्याची व शुद्ध हवा घेण्याची संधी मिळते. यासाठी बहुतेकजण सायकल चालविण्याची पॅशन जोपासतात. कुर्टी-फोंडा येथील दिप्तेश रमाकांत कुर्टीकर यालाही ही पॅशन जडली आहे. गतसाली सायक्लींग चॅलेंज-एक्सप्लोअर युवर लिमिट्स अंतर्गत टूर दी 100-विश्व सायक्लींग स्पर्धेत त्याने गोव्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. आजपर्यंत त्याने एकूण 546 सायकल राईड केले असून एकूण 30,215 कि. मी. अंतराचा पल्ला गाठला आहे. सर्वात दूरचे 627 कि. मी. चे अंतर पूर्ण केले आहे. 200 कि. मी. चार वेळा, 100 कि. मी. 139 वेळा व 50 कि. मी. चे अंतर 400 वेळा राईड करुन त्याने दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

टूर दी 100-विश्व सायक्लींग स्पर्धा 17 सप्टेंबर ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान झाली. 100 दिवस सायकल राईड करणे असा हा उपक्रम होता. प्रत्येक दिवशी कमीतकमी 5 कि. मी. सायकल चालविणे आवश्यक होते. त्यापेक्षा ज्यादा राईड करणे हे स्पर्धकावर अवलंबून होते. एकूण 1830 स्पर्धकांनी यात भाग घेतला. दिप्तेशने भाग घेतलेल्या 30 ते 39 वर्षे वयोगटात 631 स्पर्धक होते. यात दिप्तेशने देशामधून 58 वा क्रमांक तर गोवा विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. गोव्यातील 17 जणांनी यात भाग घेतला. डॉ. राहुल हेगडे यांनी द्वितीय तर शिल्पा पवार हिने तृतीय (महिला विभागात प्रथम) स्थान मिळविले. दिप्तेशने एकूण 4300 कि. मी. राईड करुन 25,900 गुण मिळविले. यात 50,069 मी. इलेव्हेशन गुण होते. त्यामुळे त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब प्राप्त  झाला. 2023 साली त्याला गोव्यातून तृतीय स्थान तर देशातून 43 वे स्थान मिळाले होते. त्याने एकूण 6181 कि. मी. राईड करुन 30,022 गुण मिळविले होते. उसगावच्या रोहन गावसने प्रथम तर कृतिका भांडारीने द्वितीय स्थान मिळविले होते. या स्पर्धेतही त्याला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब मिळाला.

Advertisement

हिरो अॅट्लस सायकलने सुरुवात

दिप्तेशच्या वडीलांची हिरो अॅट्लस सायकल होती. लहानपणापासून तो ती सायकल चालवित होता. आजूबाजूला काही सायकलपटू रंगीत जर्सी, हेल्मेट परिधान करुन राईड करताना तो न्याहाळीत होता. आपणही अशी सायकल घेऊन राईड करण्याची त्याला इच्छा होत असे. मोठा झाल्यावर त्याने नवीन हायब्रीड सायकल घेतली व तो राईड करण्यास सज्ज झाला. त्यानंतर काही सायकल ग्रूप्सशी त्याचा संबंध आला व 2015 पासून त्यांच्यासोबत राईड करण्यास जाऊ लागला. राईड व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला अजय डोंगरे, समीर नाडकर्णी, श्रवण जोग, दामोदर नाईक या तज्ञ सायकलपटूंचे मार्गदर्शन लाभले. सासष्टी 100, स्लोप्स व बॅण्ड्स फोंडा, गोपाळकृष्ण कुंडई, धाडसाकळ माशेल, पणजी सायक्लींग क्लब, वास्को, म्हापसा येथील तसेच परराज्यातील स्पर्धेत त्याने सहभाग घेऊन पारितोषिके प्राप्त केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरची नोकरी

40 वर्षीय दिप्तेश हा मडगाव पोलीस स्थानकात पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणून  नोकरी करीत आहे. सायकल राईडसाठी जाताना त्याला त्याच्या सहकाऱ्यांकडून तसेच वरीष्ठांकडूनही सहकार्य मिळत आहे. त्याचे शालेय शिक्षण कुर्टी-फोंडा येथील दादा वैद्य हायस्कूलमध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण अमेय उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. सायकल राईडबरोबरच दिप्तेश हा उत्कृष्ट फुटबॉल, कब•ाr, बॅडमिंटन व क्रिकेट खेळाडू आहे. तो एक लोक कलाकार असून जागोर, धेंडलो, शिगमो अशा लोक कलेत सहभागी होत असतो. जूनी नाणी गोळा करण्याची आवडही त्याला आहे. त्याच्या या सर्व कामात आई रश्मी, पत्नी दिपिका, भाऊ गीतेश व विवाहित बहिण सुप्रिया यांचे सहकार्य लाभत आहे. त्याला दिवेश व दर्शिल असे दोन लहान मुलगे आहेत. कामावरुन घरी आल्यानंतर तो कुळागारात काम करतो. झाडांना पाणी घालणे, नवीन झाडे लावणे ही त्याची आवडती कामे आहेत. याशिवाय सामाजिक कार्यातही तो वावरत आहे. रक्तदान करणे, रस्ते साफ करणे याची त्याला आवड आहे.

सायकलने पंढरपूर वारी

सायकल घेऊन त्याने अनेकवेळा शिर्डी व पंढरपूरची वारी केली आहे. वेगळ्या ठिकाणी जाताना विविध अनुभव गाठीशी येतात असे तो सांगतो. लोक विचारपूस करतात, जेवण देतात, मदत करतात असा त्याचा अनुभव आहे. वारी केल्यामुळे हळदोणे साई भक्त मंडळातर्फे त्याचा सन्मान झाला आहे.

सायकल कौशल्य आवश्यक

सायकल चालविण्यासाठी कौशल्य असावे लागते. खासकरुन चढाव, उतरणी, खडकाळ भागात तसेच वळणावर आपली कसोटी लागते. पावसाळ्यात सतर्क राहावे लागते. सायकल चालविण्यामुळे तसेच लोकनृत्य व कुळागारात काम केल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती लाभते, निसर्गाचे निरीक्षण होते, वेगवेगळे पक्षी, प्राणी, धबधबे व रंगबिरंगी फुले पाहून मन उल्हासित राहते असे दिप्तेश सांगतो.

भविष्यात भारत राईड करण्याची योजना

आजच्या युवकांनी सोशल मिडियावर जास्त वेळ घालविण्यापेक्षा खेळात सहभागी होऊन निरोगी जीवन जगावे. किमान सायकल राईड करुन निसर्गाचा आनंद घ्यावा असे त्याचे म्हणणे आहे. भविष्यात सायकलद्वारे भारतभ्रमण करण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे. प्रथम गोवा ते अयोध्या व त्यानंतर के टू के म्हणजे काश्मिर ते कन्याकुमारी राईड करण्याची त्याची योजना आहे.

-नरेश गावणेकर, फोंडा

Advertisement
Tags :

.