दीपश्री सावंत गावसला दोन दिवसांची पोलिस कोठडी
तीन कारगाड्या, दोन दुचाक्या जप्त
फोंडा : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रूपयांना गंडा घालणाऱ्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संशयित दीप़श्री सावंत गावस हिची दोन दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. फोंडा पोलिसानी तिला सोमवारी अटक केली होती. माशेल येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षिकेची नोकरी देण्यासाठी उसगांव येथील तक्रारदार तृप्ती प्रभू यांची तिने रु. 10 लाखांना फसवणूक केली होती, अशी तक्रार तृप्ती प्रभू यांनी पोलिसात केली होती. दीपश्री हिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आपली अटक चुकविण्यासाठी ती फरार झाली होती. पोलिसांनी तिच्याविरुद्ध लुकआऊट नोटिस जारी केली होती. अखेर बेळगाव येथून तिला ताब्यात घेण्यात आले. दीपश्री हिच्या माशेल व डिचोली येथील निवासस्थानातून तीन कारगाड्या व दोन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामध्ये एक क्रेटा, इऑन व स्वीफ्ट या कारगाड्या तर व्हेस्पा आणि एका ज्युपिटर दुचाकीचा समावेश आहे. या गाड्या तिच्याकडे कुठून आल्या याचाही तपास सुऊ असल्याचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी सांगितले.
सागर नाईकला पुन्हा अटक
दरम्यान या प्रकरणातील अन्य एक संशयित कॉन्स्टेबल सागर नाईक यालाही दुसऱ्या एका अशाच फसवणुकीच्या प्रकारणात पुन्हा अटक करण्यात आली आहे. त्याला एका दिवसाच्या रिमांडवर पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.