तुमकूर येथील डिनर पार्टी दिल्लीला शिफ्ट
खासदार राजशेखर हिटनाळ यांच्या निवासस्थानी आयोजन
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा रंगली असतानाच माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी शुक्रवारी मंत्री आणि काही आमदारांसाठी भोजनावळीचे (डिनर पार्टी) आयोजन केले होते. मात्र, सदर डिनर पार्टी राजण्णा यांच्या घरातून खासदार राजशेखर हिटनाळ यांच्या दिल्लीतील निवासस्थानी हलविण्यात आले आहे. याद्वारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बिहारचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग देण्याचा पुढाकार घेतला आहे. राज्य काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेची जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतच निर्णय घेण्यासाठी जोमात तयारी चालविली आहे. बिहारचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला रवाना होत आहेत.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांना दिल्लीत राजकीय गणिते तयार करण्यासाठी खासदार राजशेखर हिटनाळ एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देतील. त्यानुसार खासदार राजशेखर हिटनाळ यांनी मुख्यमंत्री आणि निकटवर्तीयांसाठी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी डिनर पार्टीचे आयोजन करण्याचा पुढाकार घेतला आहे. माजी मंत्री के. एन.राजण्णा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री आणि निकटवर्तीयांसाठी तुमकूर येथील निवासस्थानी भोजनावळीचे आयोजन केले होते. तथापि, शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनासह साखर कारखाना मालकांसोबतच्या झालेल्या बैठकीमुळे मुख्यमंत्री डिनर पार्टीला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, आता डिनर पार्टी हिटनाळ यांच्या दिल्लीतील निवासस्थानी स्थलांतरित झाले आहे.
शक्ति प्रदर्शनासाठी बैठक?
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यातील भोजनावळीची बैठक ही शक्ति प्रदर्शनासाठी बैठक असेल, असे म्हटले जाते. मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या चर्चेवर मुख्यमंत्री दिल्लीत बसून रणनीती आखतील, असे समजते. भोजनावळीची बैठक दिल्लीला हलविणे हे मुख्यमंत्री आणि त्यांचे निकटवर्तीय स्पष्ट हिशोबाने मैदानात उतरण्यास तयार असल्याचे लक्षण असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासह मुख्यमंत्र्यांना मजबूत पाठिंबा मिळवण्यासाठी आणि राजकीय क्रांतीच्या पार्श्वभूमीवर पुनर्रचना फासेचा जोरदार वापर करण्यासाठी ही डिनर पार्टी असल्याचे समजते.