For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिनेशकुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख

06:29 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिनेशकुमार त्रिपाठी नवे नौदलप्रमुख
Advertisement

30 एप्रिल रोजी पदभार स्वीकारणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

व्हाईस अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी देशाचे नवे नौदल प्रमुख बनणार आहेत. ते सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांची जागा घेतील. विद्यमान नौदलप्रमुख 30 एप्रिलला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर व्हाईस अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी दुपारपासून देशाचे नवे नौदलप्रमुख म्हणून पदभार स्वीकारतील.

Advertisement

दिनेशकुमार त्रिपाठी सध्या नौदलाचे उपप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. आता भारत सरकारने त्यांची बढती करत 30 एप्रिल 2024 पासून नवीन नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. 15 मे 1964 रोजी जन्मलेले व्हाईस अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त झाले. संवाद आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध विशेषज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सुमारे 39 वर्षे प्रदीर्घ आणि विशिष्ट सेवा दिली आहे. नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केले आहे.

व्हाईस अॅडमिरल त्रिपाठी यांनी भारतीय नौदलाच्या विनाश, किर्च आणि त्रिशूल या जहाजांचे नेतृत्व केले आहे. त्यांनी फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर, वेस्टर्न फ्लीटसह अनेक महत्त्वाच्या ऑपरेशनल आणि स्टाफच्या नियुक्त्या देखील केल्या आहेत. रिअर अॅडमिरल म्हणून त्यांनी नौदल कर्मचारी (नीती आणि योजना) साहाय्यक प्रमुख आणि ईस्टर्न फ्लीट कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणूनही काम केले आहे.

दिनेशकुमार त्रिपाठी यांनी प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमी, एझिमालाचे कमांडंट म्हणून व्हाईस अॅडमिरल पदावर काम केले. त्यानंतर ते नेव्हल ऑपरेशन्सचे महासंचालक झाले. सैनिक स्कूल, रीवा आणि नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासलाचे माजी विद्यार्थी असलेल्या व्हाईस अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे पुढील शिक्षण घेतले. त्यांनी नेव्हल वॉर कॉलेजमध्ये नेव्हल हायर कमांड कोर्समध्येही भाग घेतला आहे.

Advertisement
Tags :

.