लंकेच्या दिनेश चंडिमलचे शतक , कमिंदू मेंडीसचा विश्वविक्रम
वृत्तसंस्था/गॅले
गुरुवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर दिनेश चंडीमलच्या दमदार शतकाच्या जोरावर यजमान लंकेने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या डावात 3 बाद 306 धावा जमविल्या. अॅन्जेलो मॅथ्युज आणि कमिंदू मेंडीस यांनी नाबाद अर्धशतके नोंदवून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. या मालिकेतील पहिली कसोटी लंकेने यापूर्वी जिंकून न्यूझीलंडवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या दुसऱ्या कसोटीत लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेच्या दिनेश चंडीमलने शानदार शतक झळकविले. कसोटीतील त्याचे हे सहावे शतक असून त्याने 208 चेंडूत 15 चौकारांसह 116 धावा झोडपल्या.
अॅन्जेलो मॅथ्युज आणि कमिंदू मेंडीस यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 85 धावांची भागिदारी केली. मॅथ्युज 6 चौकारांसह 78 तर कमिंदू मेंडीस 1 षटकार आणि 8 चौकारांसह 51 धावांवर खेळत आहे. डी. करुनारत्नेने 109 चेंडूत 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. मात्र सलामीचा निशांका केवळ एका धावेवर बाद झाला. डावखुरा फलंदाज चंडीमलचे हे कसोटीतील गॅलेच्या मैदानावरील सहावे तर कसोटीतील 16 वे शतक असून खेळाच्या शेवटच्या सत्रात न्यूझीलंडच्या फिलीप्सने त्याचा त्रिफळा उडविला. साऊदीने निशांकाला एका धावेवर झेलबाद केले. तर करुनारत्ने चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. लंकेचा फलंदाज अॅन्जेलो मॅथ्युज एकाच मैदानावर 2 हजार धावांचा टप्पा गाठणारा सहावा क्रिकेटपटू ठरला असून यापूर्वी असा पराक्रम इंग्लंडच्या जो रुट आणि ग्रॅहम गुच यांनी केला होता. तो 6 चौकारांसह 78 धावांवर खेळत आहे. न्यूझीलंडतर्फे फिलीप्स आणि साऊदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडचे माजी संघ व्यवस्थापक इयान टेलर यांचे निधन झाल्याने न्यूझीलंड संघाने गॅलेच्या मैदानात प्रवेश करताना दंडावर काळ्या फिती बांधून श्रद्धांजली वाहिली. 1980 ते 1990 या कालावधीत इयान टेलर हे न्यूझीलंड संघाचे व्यवस्थापक होते.
कमिंदू मेंडीसचा विश्वविक्रम
लंकेचा फलंदाज कमिंदू मेंडीसने कसोटी क्रिकेटमध्ये सलग 8 अर्धशतके झळकविण्याचा विक्रम केला आहे. दोन वर्षांपूर्वी 25 वर्षीय कमिंदू मेंडीसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. मेंडीसने गेल्या आठ कसोटी सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा झळकविण्याचा विश्वविक्रम केला आहे. कमिंदू मेंडीस दुसऱ्या कसोटीत 56 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 51 धावांवर खेळत आहे.
कमिंदू मेंडीसची कामगिरी
- 2022 साली ऑस्टेलिया विरुद्ध नाबाद 61
- 2024 साली बांगलादेश विरुद्ध नाबाद 102 व 164
- 2024 साली बांगलादेश विरुद्ध नाबाद 92
- 2024 साली इंग्लंड विरुद्ध नाबाद 113
- 2024 साली इंग्लंड विरुद्ध नाबाद 74
- 2024 साली इंग्लंड विरुद्ध नाबाद 64
- 2024 साली न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 114
- 2024 साली न्यूझीलंड विरुद्ध नाबाद 51
संक्षिप्त धावफलक: लंका प. डाव 90 षटकात 3 बाद 306 (करुनारत्ने 46, निशांका 1, चंडीमल 116, मॅथ्युज खेळत आहे 78, कमिंदू मेंडीस खेळत आहे 51, अवांतर 16, साऊदी 1-54, फिलीप्स 1-33)