मैनपुरी पोटनिवडणुकीसाठी डिंपल यादव मैदानात
समाजवादी पक्षाकडून घोषणा : मुलायम सिंह यादवांच्या निधनामुळे मतदारसंघ रिक्त
वृत्तसंस्था /लखनौ
समाजवादी पक्षाने स्वतःचा बालेकिल्ला असणाऱया मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मैनपुरी मतदारसंघात आता डिंपल राजकीय वारसा सांभाळणार आहेत.
अखिलेश यादव यांनी सुमारे 5 वर्षांपूर्वी पत्नी डिंपल आता कुठलीच निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. अशा स्थितीत डिंपल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय चकित करणारा ठरला आहे. डिंपल यापूर्वी दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. कन्नौज मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढविली नव्हती.
समाजवादी पक्षाच्या वतीने मैनपुरी मतदारसंघात तेजप्रताप यादव किंवा धर्मेंद्र यादव यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाणार असल्याचे मानले जात होते. तर दुसरीकडे शिवपाल यादव देखील या मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. समाजवादी पक्षाने बुधवारी आलोक शाक्य यांना मैनपुरीसाठी पक्षाचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
भाजपच्या वतीने मैनपुरी मतदारसंघात प्रेम सिंह शाक्य, माजी खासदार रघुराज सिंह शाक्य, आमदार ममतेश शाक्य यांच्या नावांचा विचार केला जात आहे. याचबरोबर पक्षाकडून मोठा चेहरा उतरविण्याचीही तयारी सुरू असल्याचे मानले जाते. याकरता राज्याचे पर्यटनमंत्री जयवीर सिंह आणि सप संस्थापक मुलायम सिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांच्या नावाचीही चर्चा झाली आहे.
मैनपुरी पोटनिवडणुकीत मुलायम यांचे पुत्र प्रतीक यांची पत्नी अपर्णा यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. यादव समुदायाची मते अन् मुलायम यादव परिवाराच्या सदस्य असल्यामुळे अपर्णा यादव यांना संधी देण्याचा विचार भाजपने चालविला असल्याचे मानले जात आहे.