दिलजीत दोसांज याला खलिस्तानवाद्यांची धमकी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सुप्रसिद्ध पंजाबी गायक-अभिनेता दिलजीत दोसांज याला खलिस्तानवाद्यांनी धमकी दिली आहे. दोसांज याने काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांच्या पायाला स्पर्श करुन त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे खलिस्तानवादी संतप्त झाले आहेत. बच्चन यांच्या पायाला स्पर्श करुन दोसांज यांनी 1984 च्या शीखविरोधी दंगलीत बळी पडलेल्या शीखांचा अवमान केला आहे, असे खलिस्तानवाद्यांचे म्हणणे आहे. सध्या चर्चेत असलेला खलीस्तानवादी दहशतवादी गुरुपतवंतसिंग पन्नू याच्या ‘शीख्स फॉर जस्टीस’ या संघटनेने हे कारण पुढे करत दोसांज यांना धमकावले आहे. तसा धमकीचा संदेश देण्यात आला आहे.
अमिताभ बच्चन यांचा पदस्पर्श केल्याप्रकरणी दोसांज यांनी शीख समुदायाची त्वरित क्षमायाचना केली नाही, तर 1 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियात होणारी दोसांज यांची संगीत सभा (म्युझिकल कॉन्सर्ट) उधळण्यात येईल, अशी धमकी शीख्स फॉर जस्टीस या संघटनेने दिली आहे. दोसांज यांनी बच्चन यांच्या पाया पडणे हे केवळ अज्ञान नाही, तर हा शीख समुदायाचा विश्वासघात आहे. दोसांज यांनी हे पापकृत्य केले आहे, असे शीख्स फॉर जस्टीस या संघटनेचे म्हणणे आहे.
1984 चा संबंध काय...
1984 मध्ये तत्कालीन नेत्या इंदिरा गांधी यांच्या काही शीख अंगरक्षकांनी त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर दिल्ली आणि भारतात इतरत्र शीख समुदायाविरोधात प्रचंड दंगली झाल्या होत्या. दिल्लीत शीखांचा नरसंहार करण्यात आला होता. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी काही शीखविरोधी विधाने केली होती, ज्यांच्यामुळे शीख समुदायाविरोधात हिंसाचार भडकला होता, असा या संघटनेचा आरोप आहे. शीखांचे शिरकाण होण्यास कारणीभूत ठरलेल्या अभिताभ बच्चन यांचा पदस्पर्श करुन दोसांज यांनी त्या दंगलीत बळी पडलेल्या प्रत्येक शीख नागरिकाचा घोर अपमान केला आहे, असे या संघटनेचे म्हणणे आहे.