बिहार भाजप अध्यक्षपदी दिलीप जायसवाल यांची निवड
केंद्रीय मंत्री खट्टर यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमधील मंत्रिपदाचा राजीनामा देणारे भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप जायसवाल यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 6 महिन्यांपूर्वीच त्यांनी हे पद सांभाळले होते. परंतु अधिकृतपणे याची घोषणा करण्यात आली नव्हती. आता पक्षाच्या घटनेनुसार त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जायसवाल यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी स्वत:चा अर्ज सोमवारी दाखल केला होता. तर राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री हे जायसवाल यांचे प्रस्तावक झाले होते. जायसवाल यांच्या नावावर मंगळवारी भाजप नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले आहे. आता जायसवाल हे 2025-27 पर्यंत प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पाटणा येथे आयोजित कार्यक्रमात यासंबंधी घोषणा केली आहे. ‘बिहार है तैयार, फिरसे एनडीए सरकार’ असा नारा त्यांनी यावेळी दिला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, बिहारचे दोन्ही उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तसेच विजय सिन्हा यांच्यासोबत पक्षाचे वरिष्ठ नेते सामील झाले. बिहारची जनता पुन्हा एकदा एनडीए सरकारला बहुमत मिळवून देणार आहे. 2025 मध्ये आम्ही 200 हून अधिक जागांसह एनडीए सरकार स्थापन करू असा दावा सम्राट चौधरी यांनी केला आहे.