For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पाकिस्तान झिंदाबाद’वरून सत्ताधाऱ्यांची कोंडी

06:58 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पाकिस्तान झिंदाबाद’वरून सत्ताधाऱ्यांची कोंडी
Advertisement

राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हंगामा : विरोधी पक्षाकडून विधानसभेत धरणे : विधानपरिषदेत भाजपचा सभात्याग

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यसभेवर निवडून आलेले काँग्रेसचे उमेदवार सय्यद नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी मंगळवारी विधानसौध आवारात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने भाजपने सत्ताधारी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. बुधवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत या घटनेचे पडसाद उमटले. भाजप-काँग्रेस आमदारांमध्ये खडाजंगी झाल्यामुळे कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. विधानसभेत गदारोळ माजल्याने कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले. विधानपरिषदेतही तीन वेळा सभागृहाचे कामकाज लांबणीवर टाकण्यात आले.

Advertisement

बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजपच्या सदस्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिलेल्यांच्या अटकेची मागणी करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचा निषेध नोंदविला. यावेळी सभागृहात गोंधळ निर्माण झाल्याने सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी कामकाज 10 मिनिटे पुढे ढकलले. नंतर आपल्या कार्यालयात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची समझोता बैठक घेतली. सभाध्यक्षांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या प्रकरणावर चर्चा करण्यास मुभा देण्यात येईल, असे सांगितले. त्यावर दोन्ही पक्षांनी सहमती दर्शविली.

सभाध्यक्षांनी मुद्दा मांडण्याची परवानगी देताच विधानसभेत बोलताना आर. अशोक यांनी, घोषणाबाजी करणाऱ्यांचा निषेध नोंदविला. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली. या चर्चेप्रसंगी सत्तधारी आणि विरोधी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबकडे : डॉ. परमेश्वर

चर्चेनंतर सरकारच्या वतीने गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी उत्तर दिले. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक लॅबकडे व्हिडिओ पाठविण्यात आला आहे. शास्त्राrय पद्धतीने तपासणी करून कारवाई केली जाईल. ही घटना निषेधार्ह आहे. अशा घटना राज्यात कोठेही घडल्या तरी कठोर कारवाई केली जाईल, असे परमेश्वर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

यानंतर बोलताना विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, घटनेविषयी राज्यसभा सदस्य नासीर हुसेन यांनी एक शब्दही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी त्याचवेळी या घटनेचे खंडन केले असते तर विषय इतका वाढला नसता. घोषणाबाजी होत असताना नासीर हुसेन यांनी मौन बाळगणे हे उचित नाही. अशा नेत्याला तिकीट देऊन राज्यसभेवर पाठविण्यात आले आहे. पत्रकारांच्या समोरच घडलेली घटना आणि घटनेचा व्हिडिओ समोर असताना फॉरेन्सिक लॅबकडे व्हिडिओ पाठावून अहवाल येण्याची वाट पाहणे योग्य नाही. घोषणाबाजी करणाऱ्यांना अद्याप अटक न होण्याचे कारण काय?, असा परखड प्रश्न उपस्थित केला. सरकारने दिलेले उत्तर समर्पक नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत भाजप आमदारांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे आंदोलन पेले.

त्यानंतर सभाध्यक्षांनी कामकाज 10 मिनिटे पुढे ढकलले. त्यानंतरही विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने सभागृहात घोषणबाजी, आरोप-प्रत्यारोप झाले. यामुळे गदारोळ माजल्याने सभाध्यक्षांनी कामकाज गुरुवारपर्यंत पुढे ढकलले.

विधानपरिषदेत तीन वेळा कामकाज तहकूब

विधानपरिषदेतही पाकिस्तान झिंदाबाद घोषणेच्या घटनेवरून विरोधी पक्षाने सत्ताधारी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात प्रचंड गदारोळ माजला. त्यामुळे तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विधेयक मांडण्यासाठी सरकार सरसावले, त्यामुळे भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला.

सकाळी विधानपरिषदेच्या कामकाजाला प्रारंभ होताच विरोधी नेते कोटा श्रीनिवास पुजारी यांनी देशविरोधी घोषणेचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला. विधानसौधमध्येच समाजकंटकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आहे. उद्या विधानसौधमध्ये ते बॉम्ब ठेवणार नाहीत, याची काय खात्री?, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. भाजपच्या सदस्यांनीही टिकास्त्र उगारले.

चुका करणाऱ्यांची गय नाही : एच. के. पाटील

यावेळी सरकारच्या वतीने कायदामंत्री एच. के. पाटील यांनी उत्तर दिले. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. चुका करणारे कोणीही असले तर त्यांची गय केली जाणार आहे. यात राजकारण करण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी भाजपचे सदस्य के. प्रसाद यांनी मंत्री महोदयांना पाकच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचे व्हिडिओमधून ऐकू आलेले नाही. त्यांच्या कानांना कमी ऐकू येत असावे, अशी खोचक टिप्पणी केली. तेव्हा कोटा श्रीनिवास पुजारी यांनी मंत्र्यांना खोटे बोलता येत नाही. तुम्हाला मान-सन्मान असेल तर कारवाई करा. संपूर्ण राज्याला ऐकू गेलेली घोषणा, सरकारला कशी ऐकू आली नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

सभापतींकडून सरकारला सल्ला

दरम्यान, काँग्रेसचे सदस्य बी. के. हरिप्रसाद यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावेळी सभापती बसवराज होरट्टी यांनी देशविरोधी घोषणा करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश सरकारने द्यावेत, असे सांगितले. त्यानंतर सभापती कामकाज सुरू करण्यास सरसावले असता भाजप आणि निजदच्या सदस्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे सभाध्यक्षांनी कामकाज काही वेळेसाठी पुढे ढकलले.

पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा याच मुद्द्यावरून उभय पक्षांमध्ये खडाजंगी झाली. शाब्दिक चकमक वाढल्याने सभागृहाचे कामकाज 10 मिनिटे पुढे ढकलण्यात आले. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सरकारने विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपच्या सदस्यांनी सरकारच्या भूमिकेचे खंडन करत सभात्याग केला. त्यामुळे सभापतींनी कामकाज भोजन विरामापर्यंत पुढे ढकलले.

Advertisement
Tags :

.