For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतिबस्तवाड उपआरोग्य केंद्राची दुरवस्था

10:28 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
संतिबस्तवाड उपआरोग्य केंद्राची दुरवस्था
Advertisement

वर्षभरापासून आरोग्य केंद्र बंद अवस्थेत : नागरिकांना घ्यावा लागतोय खासगी दवाखान्याचा आधार : लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे

Advertisement

वार्ताहर/किणये

व्हीटीयू जवळ असलेल्या संतिबस्तवाड गावातील नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागत आहे.  या गावातील उपआरोग्य केंद्राची इमारत पूर्णपणे खराब झाल्याने गळती लागलेली आहे. दरवाजे मोडलेले आहेत. गेल्या वर्षभरापासून हे उपआरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या गावातील उपआरोग्य केंद्रच आजारी पडले आहे. संतिबस्तवाड गावातील सुमारे 6500 नागरिकांना उपआरोग्य केंद्राकडून मिळणाऱ्या सेवा बंद झाल्या आहेत. यामुळे नागरिकांना किरकोळ आजारासाठीही खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. गावात उपआरोग्य केंद्राची इमारत असूनही नागरिकांना खासगी दवाखान्याची पायरी चढावी लागत आहे. सध्या असलेल्या या उपआरोग्य केंद्राच्या स्लॅबला गळती लागली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी पडत आहे. शौचालयही व्यवस्थित नाही, दरवाजे व खिडक्या यांना वाळवी लागून खराब झालेले आहेत. फरशीच्या ठिकाणी घुस, उंदीर लागल्याने केंद्राची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून हे केंद्र बंद आहे. मागील काही महिन्यापूर्वी व्हीटीयूचे अधिकारी गावात आले होते, त्यांनी गावातील या उपआरोग्य केंद्रासाठी मदत करणार असल्याचे सांगितले होते. मात्र या अधिकाऱ्यांनीही दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली.

Advertisement

रात्रीच्यावेळी मोठी गैरसोय

या आरोग्य केंद्रात येणाऱ्या आरोग्यधिकारी व परिचारिका यांनी व्हीटीयूकडून येणाऱ्या रस्त्याच्या बाजूला एक खासगी खोली घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी सध्या नागरिकांची तपासणी करण्यात येऊ लागली आहे. गावच्या नागरिकांना तसेच गरोदर महिलांना व बालकांना उपचारासाठी या खासगी जागेच्या खोलीपर्यंत जाणे मुश्कील झाले असल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली. पूर्वी या उपआरोग्य केंद्रात 24 तास सेवा दिली जात होती. अलीकडे हे आरोग्य केंद्र बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी आजारी व्यक्तीला थेट बेळगाव व इतर ठिकाणच्या दवाखान्याला घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दवाखान्याचा खर्च परवडेनासा झाला आहे.

नवीन इमारत बांधून सुविधा द्या

गावातील उपआरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे. तर आरोग्य अधिकारी व नर्स या सकाळी एका खासगी इमारतीमध्ये येतात आणि सायंकाळी घरी जातात. गावच्या नागरिकांना या इमारतीपर्यंत जाणे त्रासदायक ठरत आहे. गेल्या 20 दिवसापूर्वी  गावातील एका महिलेला डेंग्यूची लागण झाली होती. त्या महिलेने खासगी दवाखान्यात उपचार करून घेतले. सध्याच्या या पावसाच्या कालावधीत आरोग्य खात्याकडून व उपआरोग्य केंद्राकडून आम्हाला आरोग्यासंबंधीच्या सुविधा मिळत नाहीत, संबंधित आरोग्य खाते व या भागातील लोकप्रतिनिधीनी संतिबस्तवाड गावच्या बंद अवस्थेत असलेल्या इमारतीच्या ठिकाणी नवीन इमारत बांधून गावातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

- भरमा गुडूमकेरी, संतिबस्तवाड

Advertisement
Tags :

.