For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था

12:11 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
Advertisement

चापगाव-यडोगा रस्त्याची दुर्दशा : पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची प्रवाशांसह नागरिकांची मागणी

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अॅप्रोच आणि गावांना जोडणारे रस्ते सध्या खराब झाले आहेत. या रस्त्यावरुन वाहतूक करणे कठीण झाले आहे. अनेक गावच्या रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाळा तोंडावर आल्याने खराब झालेल्या रस्त्यांची अवस्था वाहतुकीसाठी बिकट होणार आहे. काही रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करणे शक्य होणार नाही. मात्र निदान खड्डे तरी बुजवून तात्पुरती दुऊस्ती करून हे रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावे, अशी मागणी खानापूर तालुक्यातील जनतेकडून केली जात आहे.

खानापूर-पारिश्वाड रस्त्याला जोडणाऱ्या चापगाव-यडोगा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरुन चापगाव, कोडचवाडसह इतर ग्रामीण भागातील नागरिकांची वाहतूक या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र यडोगा गावापासून कत्रीपर्यंत अंदाजे एक कि. मी. रस्ता काही वर्षापूर्वी करण्यात आला आहे. मात्र उर्वरित रस्ताही खड्डेमय बनल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरील तातडीने खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

चापगाव भागाशी जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था  

चापगाव गावापासून लालवाडी गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. खानापूर-तालगुप्पा रस्त्यापासून लालवाडी गावाहून कारलगामार्गे चापगाव गावापर्यंतचा सुमारे 6 कि. मी. रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन दुचाकी व चारचाकी घेऊन जाणे मोठे आव्हान ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या पूर्ण खराब झाल्याने रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. रस्त्यावरची खडी पूर्णपणे उखडली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी झाल्यानंतर चापगावपासून शिवोलीपर्यंत रस्ता करण्यात आला आहे. मात्र शिवोलीपासून लालवाडीपर्यंत रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच चापगाव भागाशी जोडला जाणारा चापगाव-हडलगा-बेकवाड हा रस्ता देखील अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची तात्काळ दुऊस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. कारण बेकवाड, हडलगा, बंकी, बसरीकट्टी भागातील लोकांना देखील चापगावमार्गे खानापूरला येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. यासाठी याही रस्त्याची दुऊस्ती हाती घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

करंबळ-जळगा-चापगाव रस्त्याची दुर्दशा

करंबळ-चापगाव रस्ता अवघ्या चार वर्षात उद्ध्वस्त झाला असून संपूर्ण रस्त्यावरील खडी उखडल्याने या रस्त्यावरुन वाहन चालवताना धोक्याचे आणि गैरसोयीचे झाले आहे. अवघ्या चार वर्षात रस्ता उखडून गेल्याने संपूर्ण रस्त्यावर खडीचा थरच राहिल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. शासनाचे 6 कोटी 72 लाख पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया या भागातील नागरिकांसह प्रवासीवर्गातून व्यक्त होत आहे. तसेच गेल्या चार दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचले आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थ व प्रवाशांतून होत आहे. तसेच तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना जोडणारे अॅप्रोच रस्तेही धोकादायक बनले आहेत.

जांबोटी भागातील रस्ते धोकादायक

जांबोटी भागातील कान्सुली क्रॉस ते मुघवडे गावापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले असून या रस्त्यावरुन दुचाकी चालविणे म्हणजे मोठे महत्प्रयासाचे काम झाले आहे. अवघ्या पाच कि. मी. रस्त्यासाठी दुचाकीवरुन पाऊण तास लागत आहे. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरुन निलावडे, कोकणवाडा, कबनाळी, अंबोळी यासह इतर दुर्गम भागातील गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या संपूर्ण भागात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र रस्त्याच्या अवस्थेमुळे ऊस वाहतूक करणारे ट्रकही ऊस वाहतुकीसाठी नकार देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.

पावसाळ्यापूर्वी दुरुस्त न झाल्यास धोकादायक

पावसाळा तोंडावर आला आहे. जर पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी केली नसल्यास हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.

Advertisement
Tags :

.