लवकरच बसवणार डिजिटल पाणी मीटर
पाणी गळती रोखण्यासाठी प्रयोजन
पणजी : डिजिटल स्मार्ट वीज मीटरबाबत आणि त्यातून मिळालेल्या वाढीव वीज बिलामुळे जनतेत संतापाची लाट असताना आता सरकारने तशाच प्रकारे डिजिटल स्मार्ट पाणी मीटर लागू करण्याचा प्रस्ताव आखला आहे. सध्याचे पाणी मीटर बदलून नवीन मीटर बसवण्याचे प्रयोजन सरकारने आखले आहे.नव्या पाणी मीटरमुळे सरकारच्या महसूलात रु. 70 कोटीपर्यंत वार्षिक वाढ होण्याचा अंदाज आहे. म्हणजेच त्या नवीन पाणी मीटरमुळे पाण्याची बिले वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या डिजिटल स्मार्ट पाणी मीटरमुळे पाण्याची गळती रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे. या कामासाठी सरकार भागिदार खासगी कंपनीच्या शोधात असून नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ते मीटर तयार होतील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. ते पाणी मीटर परवडणाऱ्या दरात उपलब्ध केले जातील. नवीन मीटरमुळे पाणी ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. त्यासाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करण्यात येणार असून पाण्याची बिले वाढणार की तशीच येणार हे आता कळायला मार्ग नाही, ते नंतरच उघड होणार असल्याचे सांगण्यात आले.