‘मेटाव्हर्स’वर युवतीवर डिजिटल बलात्कार
जगातील पहिल्या घटनेने खळबळ, कायदा करण्याची मागणी
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनमध्ये मेटाव्हर्स या माध्यमात एका अल्पवयीन युवतीवर ‘डिजिटल बलात्कार’ करण्यात आल्याचे दृष्य दाखविण्यात आले आहे. अशा प्रकारची जगातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे ब्रिटनसह जगात खळबळ उडाली असून हा बलात्कार खरा नसला तरी ज्या मुलीवर तो झाला आहे, तिला प्रचंड धक्का बसणे शक्य असल्याने अशा व्हर्च्युअल दृष्यांवर बंदी आणणारा कायदा करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. असे प्रकार होत राहिल्यास समाजाची घडीच विस्कटून जाईल, अशी भीतीही समाजतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
हे बलात्काराचे दृष्य एका व्हिडिओ गेममध्ये दाखविण्यात आले होते. व्हर्च्युअल रुपातील एका युवतीवर काही पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचे हे दृष्य होते. हा बलात्कार खरोखर झालेला नव्हता. मात्र, ज्या युवतीचे डिजिटल स्वरुप या घृणित कृत्यासाठी उपयोगात आणण्यात आले होते, ती खरी आहे. या दृष्यामुळे या युवतीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. तसेच अनेकांचा समज तिच्यावर खरेच असा अत्याचार झाला आहे, असा होण्याची शक्यता आहे.
शारीरिक हानी नाही, पण...
हे सर्व दृष्य आभासी किंवा व्हर्च्युअल असल्याने या युवतीला शारीरिक दुखापत किंवा हानी झालेली नाही. पण हे दृष्य प्रत्यक्ष घडल्याप्रमाणे दिसते, असे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही युवती घाबरलेल्या अवस्थेत आहे, असे तिच्या पालकांनी स्पष्ट केले. खऱ्या व्यक्तींच्या डिजिटल रुपांची रचना करुन त्यांच्यावर अत्याचार करण्याची दृष्ये मोठ्या प्रमाणात दाखविली गेली तर, समाजात अशा व्यक्तींना संचार करणेही अवघड होईल. विशेषत: ज्या दर्शकांना हे आभासी दृष्य आहे, याची कल्पना नसेल तर ते अशा घटना खऱ्या समजतील. त्यामुळे समाजात प्रचंड गोंधळ निर्माण होईल, अशी चर्चा केली जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रताप
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन खऱ्या व्यक्तींच्या खऱ्या आवाजासारखे डिजिटल आवाज निर्माण करता येतात. तसेच खऱ्या व्यक्तींसारखी दिसणारी त्यांची डिजिटल आभासी रुपे निर्माण करता येतात. कित्येकदा या तंत्रज्ञानाची माहिती नसणाऱ्यांना यातील अंतर कळत नाही. त्यामुळे ते आभासी दृष्यांनाच खरी दृष्ये मानू शकतात. तसे झाल्यास त्यांची दिशाभूल होऊ शकते. खऱ्या व्यक्तींची बदनामी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे यावर उपाय शोधणे आवश्यक आहे, असे मत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नेते यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान मोदी यांचाही होता इशारा
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा दुरुपयोग रोखण्यासाठी जागतिक पातळीवर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात आयोजित केलेल्या जी-20 च्या शिखर परिषदेत केली होती. त्यांनी या तंत्रज्ञानाच्या धोक्याची जाणीव करुन दिली होती. विशेषत: विकसनशील देशांमध्ये, जिथे आजही कोट्यावधी लोकांना अशा तंत्रज्ञानाची कल्पनाही नाही, त्या लोकांची दिशाभूल करणे सहज शक्य आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
आभासी यौन अपराधांना शिक्षा हवी
ज्याप्रमाणे खऱ्या यौन अपराधांना शिक्षा करणारे कायदे अस्तित्वात आहेत, तसे कायदे आता आभासी यौन अपराधांसंबंधातही करण्याची मागणी जोरदारपणे केली जात आहे. इंटरनेटच्या अनेक युजर्सनी आता यासाठी मोठ्या अभियानाचा प्रारंभ केला आहे. कित्येकदा शारीरिक हानीपेक्षा मानसिक हानी जास्त धोकादायक असते. तसेच एखाद्यावर सूड उगविण्यासाठी किंवा त्याचे करिअर संपविण्यासाठी असे प्रकार केले जाऊ शकतात. त्यामुळे अशी दृष्ये गांभीर्याने घेऊन ती दाखविणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुरुपयोग रोखा
ड कृत्रिम बुद्धिमत्तेचा दुरुपयोग चारित्र्यहननासाठी केला जाण्याची शक्यता
ड आभासी लैंगिक दृष्ये दाखविणाऱ्यांविरोधात कठोर कायद्याची आवश्यकता
ड आभासी अत्याचारांमुळे खऱ्या व्यक्तीची मानसिक-भावनिक हानी शक्य