‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला 10 वर्षे पूर्ण
पुढील दशक मोठ्या परिवर्तनांना अनुभवणार : मोदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिजिटल इंडिया मोहिमेला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंबंधी आनंद व्यक्त करत लिंक्डइन हँडलवर ‘डिजिटल इंडियाचे एक दशक’ या शीर्षकाने एक ब्लॉग शेअर केला आहे. यात त्यांनी डिजिटल इंडियाच्या 10 वर्षांचा प्रवास मांडला आहे. 2014 मध्ये भारतात इंटरनेटचा विस्तार मर्यादित होता, परंतु 2024 मध्ये डिजिटल तंत्रज्ञानात भारत आघाडीवर पोहोचला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
भारतीय लोक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करू शकतील की नाही यावर लोक प्रथम संशय व्यक्त करायचे. परंतु सरकारने लोकांवर विश्वास ठेवला आणि श्रीमंत तेच गरीबांमधील अंतर भरून काढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. डिजिटल उपकरणे आता 140 कोटी भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा ठरली आहेत. 2014 मध्ये भारतात सुमारे 25 कोटी इंटरनेट कनेक्शन्स होती, आता ही संख्या 97 कोटीहून अधिक झाली आहे. देशात 5 रोलआउट जगात सर्वात वेगवान आहे. यात केवळ 2 वर्षांमध्ये सुमारे 5 लाख बेस स्टेशन्स स्थापन करण्यात आल्याचे मोदींनी नमूद पेले.
यूपीआयद्वारे वर्षाला 100 अब्ज व्यवहार
यूपीआय आता वर्षाकाठी 100 अब्जाहून अधिक व्यवहार हाताळत आहे. प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) 44 लाख कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले आहेत. यामुळे एजंट्सना हटवून सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा मोदींनी केला आहे.
ओएनडीसी अन् जीईएमद्वारे कोट्यावधींचे व्यवहार
ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) आणि सरकारी ई मार्केटप्लेस (जीईएम) यासारखे प्लॅटफॉर्म छोट्या व्यवसायांना मोठ्या बाजारपेठांशी जोडून त्यांचा विस्तार करण्यास मदत करत आहेत. ओएनडीसीने अलिकडेच 20 दशलक्ष व्यवहाराचा आकडा गाठला आहे. तर जीईएमने केवळ 50 दिवसांमध्ये 1 लाख कोटीपेक्षा अधिक आकड्याची विक्री केली आहे, यात 1.8 लाख अधिक महिलांच्या नेतृत्वाखालील एमएसएमई समवेत 22 लाख विक्रेत्यांनी 46,000 कोटी रुपयांची ऑर्डर्स पूर्ण केली आहेत. स्वामित्त्व योजनेच्या अंतर्गत 2.4 कोटीहू अधिक प्रॉपर्टी कार्ड्स वाटप झाले असून 6 लाखाहून अधिक गावांचा नकाशा तयार झाला असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
कोविनचा उल्लेख
भारताचे डिजिटल उपकरण म्हणजेच आधार, कोविन, डिजिलॉकर आणि फास्टॅग आता अन्य देशांकडून वापरण्यात येत आहेत. कोविनने 220 कोटी प्रमाणपत्रं जारी करत जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेच्या व्यवस्थापनात मदत केली, तर 54 कोटी वापरकर्त्यांसह डिजिलॉकरमध्ये आता 775 कोटीहून अधिक दस्तऐवज आहेत.
भारतात 1.8 लाखाहून अधिक स्टार्टअप
भारत आता जगातील आघाडीच्या 3 स्टार्टअप इकोसिस्टीमपैकी एक आहे, भारतात 1.8 लाखाहून अधिक स्टार्टअप्स आहेत. देश आर्टिफिशियल इंटेलिजेन्सप्रकरणी वेगाने वाटचाल करत आहे. भारत एआय मिशनद्वारे अत्यंत कमी किमतीत शक्तिशाली एआय टूलपर्यंत पोहोच प्रदान करत आहे. यामुळे देश डिजिटल इनोव्हेशनसाठी जागतिक केंद्र ठरला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
आगामी दशक तांत्रिक बदल अनुभवणार
पुढील 10 वर्षे आणखी अधिक परिवर्तनकारी असणार आहेत. लोकांना मदत करणारी आणि भारताला डिजिटल जगतात एक विश्वसनीय जागतिक भागीदार म्हणून ओळख मिळवून देणाऱ्या तंत्रज्ञानाचा विकास करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी इनोव्हेटर्स आणि उद्योजकांना केले आहे.