कोल्हापूर - मुंबई महामार्गावर होणार डिजिटल शिस्त!
कोल्हापूर :
कोल्हापूर-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आता ‘स्मार्ट‘ होण्याच्या वाटेवर आहे. राज्य सरकारने या मार्गासह एकूण 9 राष्ट्रीय महामार्गांवर अत्याधुनिक इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी 786 कोटी 69 लाख रुपयांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून, पुढील काळात या प्रकल्पामुळे महामार्गांवरील वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होणार आहे.
आयटीएमएस ही प्रणाली पूर्णपणे डिजिटल उपकरणांवर आधारित आहे. महामार्गावर विविध ठिकाणी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन कॅमेरे बसवले जातील, जे वाहनांची नंबर प्लेट ओळखतील. त्यासोबतच स्पीड रडार, रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्टर आणि ओव्हरलोड सेन्सर्स यांचाही समावेश असणार आहे.
या सर्व उपकरणांतून गोळा होणारी माहिती एका मुख्य नियंत्रण केंद्रात पाठवली जाईल. नियम मोडण्राया वाहनांची माहिती या कंट्रोल रूममध्ये त्वरित प्राप्त होईल आणि त्यानंतर संबंधित वाहन चालकाला थेट ई-चलान पाठवले जाईल.
ही प्रणाली 4 जी व 5 जी नेटवर्कच्या सहाय्याने कार्यरत राहील, त्यामुळे रिअल टाईममध्ये ट्रॅकिंग शक्य होणार आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्रायांवर जलद कारवाई करता येणार आहे.
- ‘स्मार्ट हायवे‘मुळे होणारे फायदे
या प्रकल्पामुळे महामार्गांचे स्मार्ट हायवेमध्ये रूपांतर होणार आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित होईल.
- 'आयटीएमएस'मुळे मिळणार हे परमुख फायदे
-अपघातांची संख्या कमी होण्यास मदत
-अतिक्रमण व बेकायदेशीर वाहतूक रोखली जाईल
-ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण
-प्रवासाचा वेळ व इंधनाचा खर्च कमी
-गुन्हेगारी तपासात मदत
- 9 महामार्गांचा समावेश
या प्रकल्पात महाराष्ट्रातील एकूण 1,967 किलोमीटर लांबीच्या 9 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर-मुंबई मार्गासह, खालील महामार्ग समाविष्ट आहेत :
-ठाणे -आच्छाड
- मुंबई - कागल (कोल्हापूर)
- नाशिक - धुळे
- पुणे - सोलापूर
- पुणे - नाशिक
- पुणे - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
- नागपूर - अकोला
- नागपूर - चंद्रपूर
- नागपूर - देवरी
हे सर्व मार्ग अत्यंत वाहतूक गजबजलेले असून, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आदी प्रमुख शहरांना जोडतात.
- महामार्गांवरील सुरक्षिततेसाठी ‘टर्निंग पॉईंट‘
वाहतुकीत शिस्त व सुरक्षिततेचा अभाव हे आजच्या काळातील मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत आयटीएमएस सारखी प्रणाली हे मोठे पाऊल मानले जात आहे.वाहतूक तज्ञांच्या मते, अपघात टाळण्यासाठी, नियम मोडण्रायांवर कठोर कारवाई करण्यासाठी, तसेच नागरिकांच्या प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- वाहतूक पोलिसांची कामगिरी सुलभ
या डिजिटल प्रणालीमुळे पोलिसांचे देखील काम अधिक सोपे होणार आहे. पूर्वी वाहनांवर कारवाईसाठी मॅन्युअल तपासणी किंवा थांबवून चौकशी करावी लागत होती. आता वाहन क्रमांक, स्पीड, वजन व अन्य माहिती डिजिटल पद्धतीने गोळा होणार आहे. त्यावरून ई-चलान पाठवले जाईल, त्यामुळे भ्रष्टाचारालाही आळा बसेल.
- उद्योग व नागरीकांना दिलासा
महामार्ग ‘स्मार्ट‘ झाल्याने व्यापार, वाहतूक, पर्यटन यासारख्या क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहनचालकांच्या वेळेची व इंधनाची बचत होईल, प्रवास अधिक सुलभ होईल.
महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर-मुंबई मार्गावर वाहनचालकांना वारंवार वाहतूक कोंडी व अपघातांचा सामना करावा लागत होता. ही डिजिटल प्रणाली त्यावर प्रभावी उपाय ठरू शकते.राज्य शासनाचा आयटीएमएस प्रकल्प महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे. नागरिकांनीही वाहतूक नियम पाळण्याचे भान ठेवले तर हा प्रकल्प राज्याच्या प्रगतीचा मार्ग अधिक सुलभ करेल.