डिजिटल अरेस्टचा शिक्षिकेला फटका
सायबर गुन्हेगारांनी सात लाखांना ठकविले : तपास यंत्रणाही चक्रावली
बेळगाव : सायबर क्राईम विभागाकडून सातत्याने जागृतीची मोहीम राबवूनही सायबर गुन्हेगारीचे प्रकार सुरूच आहेत. खासकरून डिजिटल अरेस्ट थांबता थांबेना. बेळगाव येथील एका शिक्षिकेला डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगत गुन्हेगारांनी 7 लाख रुपयांना गंडविल्याची माहिती मिळाली आहे. बेकायदा आर्थिक व्यवहारात तुमच्या मोबाईल क्रमांकाचा वापर झाला आहे. त्यामुळे तुम्ही या प्रकरणात सहभागी आहात, आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट केले आहे, असे सांगत गुन्हेगारांनी एका शिक्षिकेला ठकविले आहे. आपण फसलो गेलो हे लक्षात येताच संबंधित शिक्षिकेने सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली आहे.
तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये बंदुकीच्या गोळ्या आहेत, अमली पदार्थ आहे, असे सांगत सावजाला डिजिटल अरेस्ट करून लुटण्यात येत होते. आता बेकायदा आर्थिक व्यवहारात तुमचा सहभाग आढळून आला आहे. चौकशीसाठी तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे, असे सांगत तब्बल 7 लाख रुपये जमा करून घेण्यात आले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत डिपॉजिट जमा करा, चौकशीत तुम्ही निर्दोष आढळला तर तुमचे पैसे परत करण्यात येतील, असे सांगण्यात येते. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गुन्हेगार सावजाची चौकशी सुरू ठेवतात. रक्कम जमा करण्यासाठी एखाद्या बँक खात्याचा तपशील पाठविण्यात येतो. मोठी रक्कम जमा झाली की हे गुन्हेगार गायब होतात. डिजिटल अरेस्टच्या प्रकाराने तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे.